निळवंडे कालव्यांसाठी व्यवस्था करू - ना. पाटील
सार्वमत

निळवंडे कालव्यांसाठी व्यवस्था करू - ना. पाटील

Arvind Arkhade

राहुरी|तालुका प्रतिनिधी|Rahuri

निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी तातडीने 175 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली जाईल. निळवंडे कालव्यांची कामे बंद पडू देणार नाही. येत्या दोन वर्षात कालव्यांची कामे मार्गी लावू. 2022 साली निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात कालव्यांद्वारे सिंचनाचे पाणी सुरू होईल. असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला दिले.

राहुरी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नागेंद्र शिंदे, नाशिकचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, उपाध्यक्ष सोन्याबापू उर्‍हे, गंगाधर रहाणे, नानासाहेब गाढवे, योगेश खालकर, ज्ञानदेव हारदे उपस्थित होते.

निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 जानेवारी 2020 रोजी नाशिक विभागीय बैठकीत अकराशे कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. परंतु, बजेटमध्ये निधीची तरतूद झाली नाही. कालव्यांची कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. परंतु, निधीअभावी कामे बंद पडण्याची शक्यता आहे. असे कालवा कृती समितीने जलसंपदा मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणले. त्यावर, मंत्री पाटील यांनी निधीअभावी कामे बंद पडू देणार नाही. असे आश्वासन कृती समितीला दिले.

ठेकेदार कंपनी धीम्या गतीने कामे करीत आहे. या कृती समितीच्या तक्रारीवर ठेकेदार कंपनीला कामाचा वेग वाढविण्यासाठी सूचना द्याव्यात. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com