निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांच्या प्रश्नी शेतकरी आक्रमक

3 सप्टेंबरला अकोलेत पाणी हक्क मोर्चाचे आयोजन
निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांच्या प्रश्नी शेतकरी आक्रमक
निळवंडे

अकोले (प्रतिनिधी)

अकोले (Akole) तालुक्यात उच्चस्तरीय कालव्यांची कामे रेंगाळली आहेत, उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडले न गेल्यामुळे अनेक गावे पाण्यापासून अद्याप वंचित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत असून उच्चस्तरीय कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरणार आहेत.

शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समिती, अकोलेच्यावतीने पाणी हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे निळवंडे चे पाणी पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला, तरी अकोले तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी अद्याप मिळलेले नाही. आपली अनेक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. अनेक गावे अजूनही दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.

उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम दोन तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. केवळ नदी पात्रातील जलसेतूचे काम जाणीवपूर्वक अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्यामुळे या उजव्या उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडता आलेले नाही. अकोले तालुक्यातून इतर तालुक्यांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी निम्नस्तरीय कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. अत्यंत कठीण डोंगर फोडून व रस्त्यांवर पूल बांधून, ओढे नाले ओलांडत ही निम्नस्तरीय कालव्यांची कामे अति जलद गतीने पूर्ण केली जात आहेत. उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जल सेतुचे काम मात्र हेतुतः वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवले जात आहे. उजव्या व डाव्या कालव्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत. सिंचन क्षेत्र विस्तारण्यासाठी दिलेले पुरवणी प्रस्तावही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या मनात याबाबत मोठा असंतोष खदखदत आहे. शेतकरी आज चारही बाजुंनी अडचणीत सापडला असताना त्यात आणखी भर म्हणून पाऊस लांबल्याने त्यांच्या काळजीत मोठी भर पडली आहे.

तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर एकत्र येत, पुन्हा एकदा तालुक्यात पाणी हक्काचा लढा सुरू केला आहे. गावोगावच्या ग्रामस्थांनी याकामी पुढाकार घेत सुरू केलेल्या आंदोलनात उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करा, उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा, डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून ही कामे तातडीने पूर्ण करा.भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com