निळवंडे धरणाच्या नावाखाली विखे कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र - ना. विखे

निळवंडेचे केले जलपूजन || पत्रकारांशी साधला संवाद
निळवंडे धरणाच्या नावाखाली विखे कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र - ना. विखे

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे धरणाच्या नावाखाली विखे कुटुंबियांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र अनेक वर्षे जिल्ह्यात सुरू होते. राज्याच्या नेत्यांपासून जिल्ह्याच्या नेत्यांपर्यंत अनेकजण त्यात सहभागी होते, असा आरोप राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे येथे पत्रकारांशी बोलताना केला. मात्र, आता माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या मदतीने लवकरच डाव्या-उजव्या कालव्यात पाणी आणण्यात येणार आहे, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. या वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला कालव्यात पाणी सुटेल, असा विश्वास ना.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

निळवंडे धरणाचे काल ना.विखे यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री मधुकरराव पिचड, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, शेतकरी नेते दशरथराव सावंत, माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, शिवाजीराजे धुमाळ, सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, बी. जे. देशमुख, सीताराम देशमुख, वसंतराव देशमुख, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र लहाडे, किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र थोरात, साहेबराव वलवे, अमोल खताळ, सतीश कानवडे, हरिश्चंद्र चकोर, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, राहुल देशमुख, नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सर्व नगरसेवक, जलसंपदाचे अधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, निळवंडे ग्रामस्थ उपस्थित होते.

ना.विखे म्हणाले, अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या त्यागातूनच निळवंडे धरण उभे राहिले. त्यामुळेच आता संगमनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव तालुक्यातील शेतीला पाणी मिळणार आहे. या धरणाच्या निर्मितीमध्ये माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे मोठे योगदान आहे. समन्यायी पाणी वाटपात ज्यांनी जिल्ह्याचे पाणी घालविले, त्यांनी निळवंडेच्या उभारणीचे फुकटचे श्रेय घ्यायचे कारण नाही, असा टोला त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांना लगावला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माजीमंत्री पिचड यांनी पुढाकार घेतला व त्यामुळे धरणाच्या मुखापासून 22 किमी. कालव्याचे काम मार्गी लागले, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वाळू माफियांनी जो उच्छाद मांडला होता, त्याला बर्‍यापैकी वेसण घातली गेली असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. निळवंडे धरणाच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करत असतानाच धरणासाठी धरणग्रस्तांनी दिलेले योगदान, त्यांचे विस्थापित होणे याचे दुःख आहेच. मात्र, धरणग्रस्तांना न्याय देता आल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मधुकरराव पिचड यांनी सांगितले. दशरथराव सावंत, कै. लक्ष्मण शिंदे यांच्या योगदानाचाही ना.विखे यांनी विशेष उल्लेख केला.

निळवंडे जलाशयाला धरणाच्या निर्मितीचे शिल्पकार असणारे आणि प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करणारे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे नाव द्यावे, अशी मागणी निळवंडे प्रकल्पग्रस्तांनी एका निवेदनाद्वारे यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली.

ना.विखे यांनी जलपूजन केल्यानंतर निळवंडे लाभक्षेत्रातील अनेक नेते, कार्यकर्ते धरणस्थळावर उपस्थित होते. यावेळी ना.विखे पाटील यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com