Video : निळवंडेची पाहणी करून जलसंपदामंत्री म्हणाले...

अकोले | Akole

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण कालवा प्रकल्पांचे काम 2022 च्या मध्यापर्यंत मार्गी लावून लाभक्षेत्रात पाणी देण्याचा प्रयत्न राहील. या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. दरम्यान, हाच मुहूर्त जलसंपदा मंत्र्यांनी याआधीही दिलेला असल्याने त्यांच्याकडून मुहूर्ताची फेरउजळणी झाली.

जवळेकडलग येथील आढळा नदीवरील आढळा सेतू पुलाच्या कामाची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी सोबत होते.

याप्रसंगी नामदार पाटील म्हणाले, उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी निळवंडे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे काळातच या धरणाचे काम पूर्ण झाले. याच काळात या कामाला गती मिळाली होती. मात्र मागील पाच वर्षात काम थांबले होते.

महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी 491 कोटी भरीव निधीची तरतूद केली आहे. या कामाला गती दिली असून निळवंडे कालव्यांच्या कामाला नामदार बाळासाहेब थोरात यांनी दररोजच्या पाठपुरावा करून अत्यंत प्राधान्य दिले आहे. सर्वत्र करोनाचे संकट आहे तरीही या कामाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. 2022 मधील पावसाळ्याच्या मध्यावर या प्रकल्पाचे पूर्ण काम होऊन लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी विविध ठिकाणची स्ट्रक्चरल कामे, जमीन अधिग्रहण, पुलाची कामे अशी अनेक कामे तातडीने मार्गी लावली जात आहे.

Title Name

यावेळी नामदार जयंत पाटील, नामदार थोरात, ना. तनपुरे यांनी पुलाची स्ट्रक्चरल कामे, माती व खोद कामे, जमीन अधिग्रहण करणे या सर्व कामांची माहिती घेऊन सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिले आहेत. यावेळी सिताराम पा. गायकर, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, पं. स. सदस्य विष्णुपंत रहाटळ, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, अजय फटांगरे, राजेंद्र कडलग, भानुदास तिकांडे, कपिल पवार, मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता श्रीमती अलकाताई अहिरराव, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, कार्यकारी अभियंता गिरीश सांगानी, कार्यकारी अभियंता प्रमोद माने, संगीता जगताप, गणेश नान्नोर, भानुदास तिकांडे, उपअभियंता श्री. खर्डे, शेख, कवडे, लव्हारे, कोरे, कासार, गोसावी आदी उपस्थित होते.

जीवनाचा अविभाज्य भाग - ना.थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण यासाठी सातत्याने काम करत आहोत. हे काम पूर्णत्वास येत आहे हा मोठा आनंद आपल्याला आहे. लवकरात लवकर लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्यासाठी महा विकास आघाडी सरकार काम करत असून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने या कामासाठी मोठी मदत केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com