
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण दुसर्यांदा ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातील विसर्ग निळवंडेत दाखल होत आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी काल दुपारी 8064 दलघफू पाणीसाठा कायम ठेऊन 350 क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला. पाणलोटातील पाऊस वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.
भंडारदरा पाणलोटात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारी रात्री 9.15 वाजता स्पिलवेतूनही 609 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. विद्युतगृह क्र.1 मधून 820 असे एकूण 1429 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत होते. कालही अंब्रेला फॉल सुरू झाला आहे. धरणातून एकूण 1647 क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे निळवंडेतील पाणीसाठाही वाढला आहे. पाऊस वाढल्यास खबरदारी म्हणून या धरणातून काल दुपारपासून 350 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, काल भंडारदरा पाणलोटात सायंकाळी 7 नंतर पुन्हा पावसास सुरुवात झाल्याने पाण्याची आवक वाढणार आहे.