विखे पाटील यांच्याकडून ‘निळवंडे’चा आढावा

साकळाई योजनेचे सर्वेक्षण करणार
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण आणि कुकडीच्या पाण्यावर उभ्या राहणार्‍या साकळाई योजनेचा आढावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सहयाद्री या शासकीय अतिथीगृहावर बैठकीत घेतला. या बैठकीत साकळाई योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन पाणी प्रकल्पांची माहिती आणि प्रकल्प मार्गी लावण्यातील अडचणी जाणून घेतल्या. या बैठकीत खासदार सुजय विखे पाटील यांनी कुकडीतून पाणी उचलून साकळाई योजना राबविण्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी या योजनेचे सर्वेक्षण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले.

आजच्या बैठकीत निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याबाबत चर्चा झाली. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकर्‍यांना प्रत्यक्षात पाणी कधी मिळेल, अशी विचारणा बैठकीत झाली. त्यावेळी निळवंडेचा डावा कालवा डिसेंबर 2022 पर्यंत तर उजवा कालवा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली.

या बैठकीत खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह त्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, पुण्याचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, नाशिकचे मुख्य अभियंता बेलसरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com