निळवंडे १०० टक्के भरले

प्रवरा नदीत २३०१ क्युसेकने विसर्ग, मुळातूनही पाणी सोडले
निळवंडे १०० टक्के भरले

भंडारदरा (वार्ताहर) -

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाठोपाठ आता निळवंडे धरणही १०० टक्के भरले आहे. ८३२० दलघफू क्षमतेच्या या धरणातून काल दुपारी ११ वाजता २३०१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

कालपासून भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर वाढला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. निळवंडेतही पाण्याची आवक होत असल्याने हे धरणही पूर्ण क्षमतेने भरले. पाणलोटात पाऊस सुरू असून दोन्ही धरणं तुडूंब झाले असल्याने निळवंडेतून पाणी सोडण्यात येत आहे. भंडारदरासह पाणलोटात काल बुधवारीही पावसाचा जोर टिकून होता. दिवसभरात पडलेल्या पावसाची भंडारदरात २३ मिमी नोंद झाली आहे. पाऊस वाढल्यास निळवंडेतून आणखी पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मंगळवारपासून पाणलोटात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने मुळा नदीचे पाणी वाढले आहे. पाण्याची आवक वाढल्याने काल सकाळी १० वाजता मुळा धरणातून १०४५ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. सायंकाळी धरणातील पाणीसाठा २५८५६ दलघफू होता. तर धरणात २९८४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. पाऊस वाढल्यास धरणातून विसर्ग आणखी वाढविण्यात येईल, अशी माहिती अभियंता आंधळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com