निळवंडे निम्मे भरले
सार्वमत

निळवंडे निम्मे भरले

मुळा धरणात 153 दलघफू आवक

Arvind Arkhade

भंडारदरा,कोतूळ|वार्ताहर|Bhandardara

उत्त्तर नगर जिल्ह्याला महत्त्वाचे असलेले निळवंडे धरण काल रात्री निम्मे भरले. हे धरण झाल्यापासून प्रथमच इतक्या लवकर निम्मा पाणीसाठा झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने काल दिवसभरात 28 दलघफू पाणी आल्याने 8300 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6 वाजता पाणीसाठा 4147 दलघफू होता. रात्री 4152 दलघफू पाणीसाठा झाला होता. अर्थात धरणात गेल्यावर्षीचा साठा शिल्लक होता.

दोनच दिवसांपूर्वी भंडारदरा धरणानजीक असलेला 112.66 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. गतवर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणात मुबलक पाणीसाठा होता.त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवली नाही.

भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. गत 36 तासांत धरणात 330 दलघफू पाणी आल्याने सायंकाळी धरणातील पाणीसाठा 3657 दलघफू झाला होता. वाकी ओव्हरफ्लो 256 क्युसेकने सुरू आहे.

गत 24 तासांतील पाऊस मिमीमध्ये. घाटघर 48, रतनवाडी 52, पांजरे 44, वाकी 28. 12 तासांत भंडारदरा 11 मिमी.

मुळा पाणलोटातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील मुळा नदीतील पाणी वाहते आहे. सकाळी कोतूळ येथे 1273 क्युसेकने पाणी होते. 26000 क्षमतेच्या मुळा धरण साठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. गत 24 तासांत धरणात नव्याने 153 दलघफू पाणी दाखल झाल्याने काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 8099 (31.15 टक्के) होता.

Deshdoot
www.deshdoot.com