निळवंडे धरण कालव्यांसाठी 2 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा - आ. विखे पाटील

आ. विखे
आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

निळवंडे धरण कालव्यांच्या कामासाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणाबरोबरच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोर्‍यात वळविण्यासाठी सरकारने धोरण जाहीर करावे, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानांच्या मागण्यांवर महसूल ,जलसंपदा आणि ग्रामीण विकास या विभागांवरील चर्चेच्या दरम्यान आ.विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील सिंचन प्रकल्पांचे प्रश्न मांडून या प्रकल्पांसाठी महाविकास आघाडी सरकारचा हलगर्जीपणा उघड केला.

नगर, नाशिक जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे निधी अभावी रखडत आहेत. डाव्या आणि उजव्या कालव्यांवर एकूण 116 कामे अजुनही पुर्णत्वास जाणे बाकी आहे. अशी सर्व परिस्थिती असताना 2024 सालापर्यंत सरकार लाभक्षेत्रात पाणी कसे पोहोचविणार असा प्रश्न उपस्थित करून, आ.विखे पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी 359 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या सरकारच्या काळात तुटपुंज्या निधीमुळे कामे रखडली आहेत. त्यामुळेच जलसंपदा विभागाने पाचव्या सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या या प्रस्तावास जलसंपदा मंत्र्यांनी तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारने नद्याजोड प्रकल्पाला आता अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. त्याप्रमाणेच गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने धोरण जाहीर करावे, अशी मागणी करून, कृष्णा खोर्‍यातील पाण्याप्रमाणेच गोदावरी खोर्‍यातील पाण्याचेही गांभिर्य आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी दाखवावे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com