निळवंडेही भरले; मुळातील वाचा पाणीसाठा !

कुकडीचा साठा 91 टक्क्यांवर
निळवंडे | Nilwande
निळवंडे | Nilwande

भंडारदरा, कोतूळ |प्रतिनिधी| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाठोपाठ आता निळवंडे धरणही भरले आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8271 दलघफू (99.31टक्के) झाला. या धरणातून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर 26000 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठाही 90 टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

पाणलोटात अधूनमधून सरी कोसळत असल्याने भंडारदरात नव्याने पाणी दाखल होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 98 दलघफू पाणी दाखल झाले. हे सर्व पाणी निळवंडे सोडण्यात आले. वाकी तलावाचाही विसर्ग 197 क्युसेकने सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पाणलोटात झालेला पाऊस मिमीमध्ये-भंडारदरा 43, घाटघर58, पांजरे 37, रतनवाडी 67, वाकी 23.

मुळा पाणलोटातही अधूनमधून सरी कोसळत असल्याने धरणात धिम्या गतीने पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 22806 दलघफू (87.71 टक्के) झाला होता. सायंकाळी यात वाढ होवून तो 22940 दलघफू झाला होता. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 1393 क्युसेक आहे. हा साठा आज रविवारी 23000 दलघफूच्या पुढे जाणार आहे.

कुकडी साठा 91 टक्क्यांवर

कुकडी समूह धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा (27030 दलघफू) 91 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे आणि घोड ही धरणं तुडूंब झाली असून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. गतवर्षी या धरणात 95 टक्के पाणीसाठा होता. गत दहा दिवसांत धरणात पाण्याची आवक झाल्याने लाभक्षेत्रात दिलासा मिळाला आहे. माणिकडोहध्ये 80 टक्के, येडगाव धरणात 87 टक्के पाणीसाठा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com