राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची पाणी सोडण्याची चाचणी झाली. पाण्याचा पाझर झाला याची झळ अकोल्यातील शेतकरी वर्गाला बसली. पण आता हा पाझर थांबण्यासाठी पुढील नियोजन कधी करणार असा सवाल जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी केला आहे.
निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची चाचणी नुकतीच पार पडलेली आहे. पाणी मुख्य कालव्याच्या अंतीम भागापर्यंत पोहचले आहे. परंतु या चाचणी दरम्यान अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात सुरुंगाने फोडलेल्या खडकातून मोठ्या प्रमाणात पाझर होऊन शेती व घरात पाणी शिरले. या पाझरामुळे नुकसान झाल्याने स्थानिक शेतकर्यांनी कालवा बंद करणेसाठी आंदोलने केली. त्यामुळे या भागातील निळंवडे डाव्या कालव्याच्या काँक्रिट अस्तरीकरणाचे काम तातडीने सुरु करणे गरजेचे आहे.
बोगद्यात पाण्याचा व्यय मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथेही प्रधान्याने अस्तरीकरण होणे अपेक्षित आहे. त्या संदर्भातील अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया तातडीने राबवून पावसाळा संपल्यानंतर ही कामे तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. कामे कमी वेळेत होणेसाठी कामाचे भाग पाडुन जादा ठेकेदार नेमणे आवश्यक आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यास निळवंडे कालव्यात पुन्हा पाणी सोडण्याचे वेळी स्थानिक शेतकर्यांकडून विरोध होऊन ऐनवेळी अडचणी उद्भवतील.
निळवंडे कालव्याच्या पाणी नियंत्रणासाठी द्वार नियंत्रक दरवाजे, अतिवाहके यांची कामे होणे आवश्यक आहे परंतु जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून तसेच मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडून याबाबत गेले वर्षभर टोलवाटोलवी चालु असल्याने ती कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. क्षेत्रिय पातळीवर हा विषय सुटेल याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे हा विषय वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने घेऊन सर्व संबधितांच्या समन्वयाने मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. दरवाजे नसल्याने कालवा चाचणीच्या वेळी मातीचे तात्पूरते बांध घालून वेळ मारुन नेली.
परंतु मातीचे बांध शेतकरी फोडतात आणि त्यामुळे लाभधारकांमध्ये आपापसात वाद होतात व बांध फोडाफोडीमुळे पाण्याचा अपव्ययही होतो. तरी दरवाजे बसविण्यास झालेल्या विलंबाच्या कारणांची चौकशी करुन हा विषय निकाली काढणे गरजेचे आहे. निळवंडे डाव्या कालव्याच्या पुच्छ कालव्याचे शेवटचे 2 किमी तसेच तळेगाव शाखा, कोपरगाव शाखा व निमगावजाळी निम्नस्तरीय वितरीका यांची कामे अपूर्ण असून ती तातडीने पुर्ण करावीत. निळवंडे उजव्या कालव्याचे मातीकाम व बांधकामे अद्यापही 35 टक्के अपूर्ण आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन कामास गतीमान केले पाहिजे.
पाण्याचे वितरण करण्यासाठी जी बंद नलिका वितरण प्रणाली करणे प्रस्तावित आहे ती गेल्या सहा महिन्यांपासून सर्व्हेक्षण पातळीवरच रेंगाळलेली आहे. परिणामी त्या संदर्भातील अंदाजपत्रके, निवीदा प्रक्रिया व ठेकेदार निश्चित करणे यामध्ये दिरंगाई होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने अंतिम करण्यात यावी. वितरण प्रणालीची कामे जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत शेवटच्या शेतकर्यापर्यंत पाणी पोहोचणार नाही. कालवा चाचणी यशस्वी झाली हे शेतकर्यांचे तात्पुरते समाधान ठरेल व त्यात दिरंगाई झाली तर शेतकर्यांमध्ये असंतोष वाढीस लागेल. जवळपास 65 हजार हेक्टर क्षेत्रावर ही वितरण प्रणाली कार्यान्वित करावयाची असल्याने हा विषय प्राधान्यक्रमात घेणे आवश्यक आहे.
सध्या चालु असलेली कामे आणि नव्याने सुरु करावयाची कामे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. नाबार्डसह सध्याची एकुण 370 कोटीची तरतूद पुरेशी नाही. त्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध करणेसाठी यथोचित कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे. पाझर व गळती थांबविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- उत्तमराव निर्मळ (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा)