निळवंडे कालव्याच्या पिंपरी निर्मळ शिवारातील कामांना गती

नगर-कोल्हार रस्ता क्रॉसिंगच्या पुलाचे काम सुरू
निळवंडे कालव्याच्या पिंपरी निर्मळ शिवारातील कामांना गती

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापुतील 182 गावातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पिंपरी निर्मळ शिवारातील अंत्यकालव्याच्या कामाची तसेच नगर-कोल्हार चौपदरी रस्ता क्रॉसींग करणार्‍या पुलाच्या कामाची पहाणी निळवंडे कृती समितीच्या सदस्यांनी केली.

उत्तर नगर जिल्ह्यातील कायमच दुष्काळी 182 गावातील 68 हजार हेक्टरवरील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव 51 वर्षापुर्वी करण्यात आला. धरण बांधुन झाले त्यात पाणीही साठविले जात आहे. मात्र कालव्यांची कामे रेंगाळल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याचे वास्तव सत्य आहे.

महाविकास आघाडी सरकारने चालु वर्षी अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी 365 कोटीच्या भरीव निधीची तरतुद केल्यामुळे कालव्यांच्या कामाला गती मिळाली आहे. कालव्यांची कामे 75 टक्के पूर्ण झाली आहेत. येत्या नोव्हेंबरपासून मुख्य कालव्याची चाचणी करण्याची घोषणा सरकारने केली आहे.

पिंपरी निर्मळ शिवारातील अंत्य कालव्यांच्या कामानेही वेग घेतला असून परिसरातील नगर-कोल्हार चौपदरी रस्ता क्रॉसींग करणार्‍या पुलाचे काम सुरु झाले आहे. निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, सचिव उत्तम घोरपडे, आण्णासाहेब वाघे, सौरव शेळके, दत्ता भालेराव, मोहन शेळके, श्री. गाडकवाड सह सदस्यांनी या कामाचा आढावा घेवून कामाबाबत समाधान व्यक्त केले. येत्या नोव्हेंबरमध्ये या कालव्यांद्वारे पाणी वाहिल्यास जिरायत शेतकर्‍यांचे स्वप्न पुर्ण होण्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com