
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती टापुला वरदान ठरणार्या निळवंडेच्या मुख्य कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पिंपरी निर्मळ परिसरात कालवे वेड्या बाभळींनी वेढले आहेत. सुरु असलेले सिंमेट कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची होत आहेत. लेवल मेंटेनसाठी टाकण्यात आलेले प्रोफाईल वॉल विना स्टीलचे तयार केले असून त्यालाच लेवल नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उजव्या कालव्यांची कामे सहा महिन्यातही पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मार्च महिन्यात कशी चाचणी होणार असा प्रश्न लाभधारंकाना पडला आहे.
निळवंडे धरणात बारा वर्षापासून पाणी साठविले जात आहे. मात्र कालव्यांची कामे रेंगाळल्यामुळे लाभक्षेत्राला कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. येत्या मार्च महिन्यात मुख्य कालव्याची चाचणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आता जानेवारी अर्धा संपला आहे. मार्च महिना उजाडायला अवघा सव्वा महिना बाकी आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उजव्या कालव्याचे काम पुढील सहा महिन्यातही पूर्ण होण्याची शक्यता नाही. तसेच डाव्या कालव्यांवरील पिंपरी निर्मळ परिसरातील काम पूर्ण झालेला मुख्य कालवा प्रंचड मोठ्या प्रमाणात वेड्या बाभळीनी गुंफला आहे. जवळच सुरू होणार्या अंत्य कालव्याची फिनीशिंग बाकी आहे.
या कालव्यामध्ये लेवल मेंटेन करण्यासाठी दर दोनशे मिटर वर प्रोफाईल वॉल टाकण्यात आल्या आहेत. यामुळे कालवा वाहता झाल्यावर कीती माती वाहते यांचा अंदाज येतो. मात्र या प्रोफाईल वॉलच अत्यंत कमजोर बनविण्यात आल्या आहे. चाचणीच्या प्रवाहात त्यांनाच आपली लेवल राखणे अवघड होणार आहे. यामध्ये स्टीलचाही वापर करण्यात आलेला नाही. नगर-मनमाड महामार्ग क्रॉसींगचा अर्धा पुल होणे अद्याप बाकी आहे.
तसेच कालवा प्रवाहीत झाल्यावर चार्या व पोटचार्या नसल्याने परिसरातील ओढे व तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी मुख्य कालव्याला एस्केप टाकावे लागणार आहे.त्याबाबतही अद्याप कोणत्याच हालचाली नसल्याने उरलेली कामे व उद्घाटनाचा मार्च महिन्याचा अवधी पहाता रात्र थोडी अन सोंगे फार अशीच अवस्था दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दोन्ही मुख्य कालव्याची चाचणी कशी होणार ? असा प्रश्न लाभधारक शेतकर्यांना पडला आहे.