
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे आदेश असतानाही अकोले तालुक्यात काही नागरिकांनी निळवंडे कालव्यांचे काम बंद केले होते. जलसंपदा विभाग व महसूल विभागाने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने निषेध करून संगमनेर प्रांत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन खा.सदाशिव लोखंडे व प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन दिले. त्यानंतर काम सुरू करण्यास संमती दिली असल्याने निळवंडे कालवा कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे.
अकोले तालुक्यात किरकोळ कारणातून काम बंद केल्याची माहिती समितीला प्राप्त झाली होती.संदर्भीय शेतकर्यांच्या काही विधायक व कायदेशीर अडचणी असतील तर शेतकरी म्हणून त्या सन्मानपूर्वक सोडून प्रशासनाने त्या मार्गी लावून त्यातून मार्ग काढावा त्यासाठी निळवंडे कालवा समिती शेतकर्यांबरोबर असल्याचा दिलासा दिला होता. तथापि बेकायदा मागण्या करून कोणी निळवंडे कालव्यांचे काम पडद्याआडून कोणी वेठीस धरीत असतील त्यावर सनदशीर मार्ग काढण्याचे काम अ.नगर चे जिल्हाधिकारी, महसूल व पोलीस विभागाचे असल्याची जाणीव करून दिली होती.
व त्यासाठी संगमनेर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे,जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने आदींना समक्ष भेटून शुक्रवार दि.03 मार्च रोजी निवेदन दिले होते. सदर काम तातडीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पूर्ण करावे, असे आवाहन कालवा कृती सामितीचे नामदेवराव दिघे यांनी केले होते. याची दखल घेऊन सोमवारी सायंकाळी खा.सदाशिव लोखंडे व संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने आदींनी म्हाळादेवी येथे भेट घेऊन नागरिकांना विधायक मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे व दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी सदर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बंद केलेले काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.