
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापूतील 182 गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण बांधून झाले आहे. त्यामध्ये पंधरा वर्षापासून पाणी साठवले जात आहे. मुख्य कालव्यांपैकी डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून प्रशासनाने तातडीने महिना अखेर या कालव्याची चाचणी घ्यावी अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशारा निळवंडे पाटपाणी कृती समितीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. शासन पातळीवर अनेकदा या कालव्याची चाचणी करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र वेळोवेळी ही आश्वासने हवेतच विरली.लाभधारक गावांमध्ये प्रचंड दुष्काळाची व टंचाईचे वातावरण आहे. आशा परिस्थितीमध्ये कालव्याची चाचणी घेतल्यास या लाभधारक शेतकर्यांना दुष्काळात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार होणार आहे. तसेच येत्या पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणीही या कालव्याद्वारे जिरायती टापूतील ओढे-नाले व तळ्यामध्ये सोडता येणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना कालव्यांची चाचणी होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काही मंडळी जाणीवपूर्वक ही चाचणी रखडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
निळवंडेच्या उजव्या कालव्याचे काम यंत्रणा वाढवून येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे तसेच पूर्ण झालेल्या मुख्य डाव्या कालव्याची चाचणी येत्या 30 मे पर्यंत पूर्ण करावी व गेल्या पन्नास वर्षापासून या पाण्याची वाट पाहणार्या लाभधारक शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा निळवंडे पाटपाणी कृती समिती उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तम घोरपडे, सचिव विठ्ठल घोरपडे, समितीचे सदस्य अण्णासाहेब वाघे, सौरव शेळके, मोहन शेळके, रंगनाथ निर्मळ, बाबासाहेब झराळे, मच्छिंद्र घोरपडे, अक्षय सोनुळे, विजय मगर, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, शिवाजी शेळके, प्रभाकर गायकवाड, विलास गुळवे, बाळासाहेब घोरपडे, सुरेश वाघ, योगेश गमे आदींसह मोठ्या संख्येने लाभधारक शेतकरी उपस्थित होते.