
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
उत्तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या सात तालुक्यांतील दुष्काळी शेतकर्यांना वरदान ठरणार्या निळवंडे धरण प्रकल्पाचे काम गौण खाणी बंद केल्यामुळे मंदावले असून ते महसूल मंत्री व संबंधित विभागाने त्वरित सुरू करावे, अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी केली आहे.
निळवंडे हा प्रकल्प 52 वर्षांपुर्वी सुरू केला तेव्हा त्याची किंमत 7.96 कोटी रुपये असताना आता पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर ती साधारण 05 हजार कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च होऊनही लाभ क्षेत्रातील शेतकर्यांचे एक एकरही सिंचन होऊ शकले नाही.यामुळे सुमारे 52 वर्षांपासून या प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत आहे.
हा प्रकल्प आधीच, तीव्र पावसाळा आणि मजुरांचा अभाव आदी बाबीमुळे वेळेत पूर्ण होईल याबाबत जलसंपदा विभाग सांशक असल्याने व न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगत त्यांनी सदर मुदत दि. 21 जुलै रोजी वाढवून डिसेंबर 2022 करून घेतली होती.
दरम्यानच्या काळात नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील गौण खनिज खाणी महसूल विभागाने दोन महिन्यांपासून बंद केल्या असून त्यामुळे या निळवंडे प्रकल्पाला वाळू, दगड, खडी व तत्सम गौण खनिज साहित्याचा पुरवठा जवळपास 70-80 टक्के बाधित झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला आणि त्यांच्या ठेकेदाराला काम करणे जिकरीचे बनले असून सदर प्रकल्प एकदा उच्च न्यायालयात वाढवून दिलेल्या डिसेंबर 2022 या मुदतीत पूर्ण करणे अवघड बनले आहे.
आतापर्यंत या प्रकल्पाचा डावा कालवा 85 तर उजवा कालवा 70 टक्के पूर्ण झाला आहे. मुख्य कालव्यावर 677 बांधकामे असून त्यापैकी 495 कामे पूर्ण झाली आहेत 67 कामे प्रगतीपथावर आहे तर 115 बांधकामे अद्याप सुरू करावयाची असल्याची बाब माहिती अधिकारात दि.15 नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभाग संगमनेर यांचेकडून कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांना नुकतीच प्राप्त झाली आहे. यात मिळालेल्या माहितीनुसार सदर कालव्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणी विचारल्या असता जलसंपदाने, मागील जवळपास दोन महिन्यांपासून संगमनेर,अकोले तालुक्यातील दगड खाणी बंद आहेत.फस्टोन क्रशरफ महसूल विभागाकडून सील करण्यात आले असल्याचे कारण नमूद करून प्रकल्पाच्या बांधकामास खडी व वाळू यांचा पुरवठा बंद झाल्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाच्या गतीवर परिणाम झाल्याचे नमूद केल्याने दुष्काळी शेतकर्यांत संताप व्यक्त होत आहे.
या खाणी कोणी आणि कशासाठी बंद केल्या आहेत? त्यामागे काय कारण आहे याचा महसूल प्रशासन यांनी शोध घेऊन सदर गौण खाणी त्वरित सुरू कराव्या व निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामास गती द्यावी व त्या दृष्टीने महसूल व जलसंपदा विभागाने तातडीने पावले उचलून सदर खाणी तातडीने सुरू कराव्या, अशी मागणी कालवा कृती समितीने दि. 21 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचेकडे केली असल्याची माहिती गंगाधर रहाणे यांनी दिली आहे.
या निवेदनाच्या प्रति महसुल विभागाचे प्रधान सचिव, नाशिक विभागाचे आयुक्त, गोदावरी खोरे, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग,नाशिकचे मुख्य अभियंता, नगरचे जिल्हाधिकारी, जलसंपदाचे नगर येथील अधीक्षक अभियंता, ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प-2 (निळवंडे) कालवा, धरण विभाचे कार्यकारी अभियंता आदींना पाठवल्या आहेत.