निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | Mumbai

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडे, कुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या. बैठकीस खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आ. बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले , जलसंपदा विभागाचे (लाक्षेवि) सचिव राजन शहा, सचिव ( प्रकल्प समन्वय) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

निळवंडे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. निळवंडे प्रकल्पाचा प्रस्तावित सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी तांत्रिक समितीकडे सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरात लवकर मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

निळवंडे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील वितरण प्रणालीचे काम बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे. मात्र राहुरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गोदावरी कालवा प्रकल्पांच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी, कुकडी सिंचन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता द्यावी. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी समावेश करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, पुणे विभाग मुख्य अभियंता हणमंत धुमाळ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com