
शिरूर |प्रतिनिधी| Shirur
पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील निघोज येथील कुंड पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध रांजण खळगे पाहत असताना पाय घसरून पडल्याने वाशिम जिल्ह्यातील एक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि. 8) सायंकाळी पावणे 5 च्या सुमारास घडली. उशिरापर्यंत तिचा शोध सुरु होता मात्र तपास लागला नाही.
पद्माबाई शेषराव काकडे (55, रा. मोहगव्हाण ता. कारंजा, जि. असे यात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काकडे या नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहण्यासाठी निघोज कुंड येथे आल्या होत्या. अचानक त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात पडल्या. हे पाहताच त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले मात्र पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.
सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांना काकड यांना वाचवता आले नाही तसेच त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. रांजण खळग्यात त्यांचाही जीव थोडक्यात बचावला असल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले. वाहत्या पाण्यामुळे शोध घेणे अवघड झाल्याने पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना पोलिसांनी संपर्क साधला असून सर्वजण पाणी बंद होण्याची वाट पाहत आहेत.