
कोपरगाव | तालुका प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी-धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात पुलाखाली पुरूष जातीच्या नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी धारणगाव शिवारातील गोदावरी नदीवरील पुलावरुन अज्ञात व्यक्तीने 15 दिवसीय नवजात अर्भकास नायलॉन कापडी पिशवीत भरुन गोदावरी नदीपात्रात फेकून दिले. सदर बालकाच्या डोक्याला मार लागून त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवली असता तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर नवजात बालकाच्या मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हे नवजात बालक जिवंत असताना नदीपात्रता फेकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.