नेवासा शहर पाणीपुरवठ्यासाठी 34 कोटी

मंत्री शंकरराव गडाख यांचे प्रयत्न || नगरोत्थान योजनेत मंजुरी
नेवासा शहर पाणीपुरवठ्यासाठी 34 कोटी

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत नेवासा शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी एकूण 34 कोटी 15 लाख रुपयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

नामदार शंकरराव गडाख यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर केला आहे. यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे. त्यानुसार हे काम पूर्ण करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला असून प्रकल्प खर्चाच्या 10 टक्के रक्कम नेवासा नगरपंचायतीने स्वनिधीतून भरावयाची अट मान्यतेत घालण्यात आलेली आहे.

नेवासा शहराची वाढती लोकसंख्या व दैनंदिन पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन अस्तित्वातील जुन्या योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा अशुद्ध होत असल्याने व शहराच्या गरजेच्या तुलनेत तो खूपच कमी पडत असल्याने शहरातील नागरिकांची नवीन शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करणारा प्रकल्प उभारावा अशी बर्‍याच दिवसांपासूनची मागणी होती. जुनी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सन 1997 मध्ये म्हणजे 24 वर्षांपूर्वी त्यावेळच्या लोकसंख्येनुसार अहमदनगर जिल्हा परिषदे मार्फत 40 एल पी सी डी प्रमाणे बनविलेली होती.

नेवासा हे तालुक्याचे ठिकाण असून दैनंदिन शासकीय व इतर कामासाठी तालुक्यातून रोज मोठ्या संख्येने नागरिक याठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे नेवासा हे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचनास्थान असल्याने या तिर्थक्षेतत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने याठिकाणी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. शहराची वाढलेली लोकसंख्या व वाढलेले उद्योग व्यवसाय यांचा विचार करता अस्तित्वातील योजना खूपच अपुरी पडत असल्याने तसेच जुन्या 5 एम एल डी डब्ल्यू टी पी ची अवस्था पूर्णतः जीर्ण झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून नवीन 7 एम एल डी क्षमतेच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून प्रति माणसी 135 लिटर प्रतिदिन पाणी मिळणार आहे. याप्रमाणे नवीन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने व येत्या दीड-दोन वर्षात पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लागत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com