
नेवासा | तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील महालक्ष्मी देवस्थान वरखेड येथे आषाढ महिन्याचा शेवटचा मंगळवारी (दि.२६ जुलै) दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वरखेडकडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती देवस्थान व पोलिस यंत्रणेने दिली.
उद्या (दि.२६) जुलै रोजी आषाढ महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक वरखेड देवीच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु पावसामुळे मंदिर परिसरात जागा नसल्याने मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर वरखेड-रामडोह रस्त्यावर 30 एकर खडकाळ जमीन भाविकांना थांबण्यासाठी उपलब्ध असल्याने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरखेड येथे येणाऱ्या भाविकांच्या मार्गात व वाहनतळात बदल करण्यात आला आहे.
वरखेड देवी मंदिर परिसरात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र चिखल झाल्यामुळे भाविकांना उतरण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याकारणाने वरखेड देवस्थान पासून एक किलोमीटर अंतरावर खडकाळ माळरान उपलब्ध केले असल्याने पोलीस प्रशासनाने व देवस्थाने ट्रस्टने भाविकांना अडचण निर्माण होऊन गैरसोय टाळण्यासाठी त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होऊ नये या कारणास्तव वरखेड येथे येणाऱ्या भाविकांच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे.
बदललेला मार्ग असा
शिरसगाव येथून वरखेडकडे न येता गोपाळपूर ,रामडोह या मार्गाने येऊन मंदिर देवस्थान पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माळरानावर भाविकांनी थांबावे व वाहने पार्किंग करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विजय करे, वरखेड देवस्थानचे उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे व सचिव कडूपाटील गोरे यांनी केले आहे.