नेवासा वाहतूक पोलिसावर कारवाई करावी

अ‍ॅटो रिक्षा संघटनेची एसपींकडे मागणी
नेवासा वाहतूक पोलिसावर कारवाई करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याच्या संभाषणाची ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्या कर्मचार्‍याच्या विरोधात नेवासा तालुका अ‍ॅटो रिक्षा संघटनांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची बुधवारी भेट घेत निवेदन दिले आहे.

अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याबाबतचे निवेदन नेवासा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याचा राग मनामध्ये धरून पोलीस कर्मचारी किरण गायकवाड यांच्यासह तीन ते चार वाळू तस्करांनी खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर अध्यक्ष श्रीपती दारूंटे, सचिव श्रीनिवास डहाळे, उपाध्यक्ष अंकुश म्हस्के, सचिन नागापुरे, बाळासाहेब निकम, भरत तालतुरे, किरण डाके आदींच्या सह्या आहेत.

नेवासा तालुका अ‍ॅटो रिक्षा संघटनेने अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली होते. यानंतर पोलीस कर्मचारी गायकवाड व इतर तीन ते चार वाळू तस्कर संघटनेचे अध्यक्ष दारूंटे यांच्या घरी गेले. त्यांना फोन करून बाहेर बोलावले व डहाळे आणि तुम्ही अवैध प्रवासी वाहतूकचे निवेदन का दिले, असे विचारत माझ्या लोकांना तुमच्याविरोधात खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करायला लावून तुम्ही करत असलेला व्यावसाय मोडकळीस आणिल, अशी धमकी दिली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गायकवाड व इतर व्यक्तींकडून आमच्या जिवीतास धोका असल्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान धमकी दिल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अधीक्षक पाटील यांना दिली आहे.

ऑडिओ क्लीप संदर्भातील माहिती मिळाली असून याबाबत नेवासा पोलीस निरीक्षक यांच्याकडे अहवाल माहितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

- मनोज पाटील, पोलीस अधीक्षक

Related Stories

No stories found.