नेवासा ते पंढरपूर सायकल वारी

17 तासांत केले 257 किलोमीटर अंतर पार
नेवासा ते पंढरपूर सायकल वारी

नेवासाफाटा (वार्ताहर) / Newasa - मुकिंदपूर परिसरातील युवकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी सायकलवर जाऊन नेवासा ते श्रीक्षेत्र पंढरपूर हे 257 किलोमीटरचे अंतर अवघ्या सतरा तासांत पार केले.

ओमसाई सायकलिंग व ट्रॅकिंग ग्रुपच्यावतीने नेवासा येथील श्री ज्ञानेश्‍वर मंदिर ते श्रीक्षेत्र पंढरपूर सायकल वारी काढण्यात आली होती. या सायकल वारीमध्ये ओमसाई सायकल ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत बडाख, चंद्रकांत सेवक, गणेश माटे, दिलीप गिरी, भारत गोरे, अल्ताफ शेख व पवन काळे आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी ओमसाई ग्रुपच्यावतीने पांडुरंगचरणी महाराष्ट्र राज्यावर, देशावर तसेच जगावर आलेले करोना महामारीचे संकट जाऊ दे, सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना करण्यात आली.

या महामारीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी आपले शारीरिक आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहन यावेळी प्रशांत बडाख यांनी केले.

सायकल वारीसाठी दिनेश सरगैये, आदित्य सेवक व पुंडलिक लष्करे यांनी विशेष सहकार्य केले. ही सायकल रॅली 9 तारखेला पहाटे 5 वाजता निघाली होती. नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकापासून निघालेली ही सायकलवारी वडाळा बहिरोबा, घोडेगाव, अहमदनगर, मिरजगाव, करमाळा, टेंभुर्णी मार्गे पंढरपूरला पोहचली. सायकल रॅलीचे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सायकलिंग करणे हे आरोग्य व शरिरासाठी किती उपयुक्त आहे हे अध्यक्ष प्रशांत बडाख यांनी यानिमित्ताने सर्वांना समजावून सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com