नेवासा तालुक्यातील पाणी योजनांसाठी पावणेतीनशे कोटींचा निधी मंजूर

नेवासा तालुक्यातील पाणी योजनांसाठी पावणेतीनशे कोटींचा निधी मंजूर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

माजी जलसंधारण मंत्री आ. गडाख यांनी विशेष प्रयत्न करून तालुक्यातील 126 गावांमधील पाणी योजनेसाठी 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून नेवासा तालुक्यातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट दिले आहे.

तालुक्यातील वीज,पाटपाणी व पिण्याचे पाणी या नागरिकांच्या, शेतकर्‍यांच्या व विशेषतः माता भगिनींच्या मूलभूत व दैनंदिन जीवनाशी निगडित असणार्‍या महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक यातून केली आहे.

जलजीवन मिशन योजनेतून नेवासा तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणार्‍या 8 प्रादेशिक व मोठ्या पाणी योजनांची व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबिवण्यात येणार्‍या 49 नळ पाणी योजनांची कामे मार्गी लागणार आहेत या सर्व योजनांच्या कामांना लवकरच सुरवात देखील होणार आहे. या योजनांचा फायदा नेवासा तालुक्यातील 126 गावांना होणार असून यामध्ये नवीन मंजूर झालेल्या योजनांबरोबरच जुन्या योजनांचीही विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीचा राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे यामध्ये राज्य सरकारचा 50 टक्के व केंद्र सरकारचा 50 टक्के निधी व काम पूर्ण झाल्यानंतर योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 10 टक्के लोकसहभाग रक्कम स्थानिक पाणी व स्वच्छता समितीच्या खात्यांवर जमा करून या योजना चालवल्या जातील.

पाणी योजनांचे गावा गावातील सर्वेक्षण, अंदाज पत्रके तयार करणे याबतीत अधिकार्‍यांसह बैठका, आढावा घेत, आ. गडाख यांनी मंजुरीच्या टप्प्यापर्यत व्यक्तिगत पाठपुरावा करून या पाणी योजना मंजूर करून आणल्या आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आ. शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने अधिकार्‍यांसह मीटिंग आयोजित करण्यात आली व यामध्ये तालुक्यातील पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली होती.

यामध्ये मुळा उजवा कालव्यावरील मोरयाचिंचोरे, लोहोगाव, वंजारवाडी व धनगरवाडीसह 4 गावांच्या योजनेसाठी 37.35 कोटी रुपये तर जायकवाडी बँक वॉटरवर आधारित मुकिंदपूर, भानसहिवरे व इतर 6 गावांसाठी प्रादेशिक योजनेला 34 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यात हंडीनिमगाव, सुरेशनगर, बाभूळवेढा, उस्थळदुमाला, रांजणगाव देवी, कारेगाव यांचा समावेश आहे तर घोडेगावसाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून ही योजना मुळा उजवा कालव्यावर राबवली जाणार आहे.

वडुले व इतर 5 गावांसाठी 30 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली असून यामध्ये सुकळी खुर्द, सुकळी बुद्रुक, नांदूर शिकारी, पाथरवाला, सुलतानपूर या गावांचा समावेश आहे तसेच सोनईसह 16 गावांच्या प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी तर गळनिंब प्रादेशिक पाणी योजनेच्या 20 गावांच्या पाणी योजना दुरुस्तीसाठीही 22 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घोगरगावसह 10 गावांच्या प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठीही 19.25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून भेंडा- कुकाणा या प्रादेशिक योजनेत भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, चिलेखनवाडी, अंतरवली व तरवडी या 6 गावांचा समावेश असून 20.27 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

प्रादेशिक मोठ्या योजना व्यतिरिक्त तालुक्यातील इतर 52 गावासाठी पाणी योजनांना निधी मंजूर झाला असून त्यातील 34 योजना दुरुस्तीच्या असून आता नव्याने 15 योजनांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 39 योजनांच्या काम सुरू करण्याचे आदेशही निघाले आहेत. या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत. एकाच वेळी सर्वच गावतील पाणी योजनांना निधी मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे यात आपलीही साथ हवी, असे आवाहन आमदार गडाख यांनी केले आहे.

या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी....

मांडेगव्हाण,मोरगव्हाण वडाळा, मक्तापूर, पिचडगाव, नजीक चिंचोली, गोंडेगाव, चिंचबन, लोहारवाडी, सौंदाळा, धनगरवाडी, पुणतगाव, देवसडे, महालक्ष्मीहिवरे, रस्तापूर, झापवाडी, वांबोरी, कांगोणी, बर्‍हाणपूर, पानसवाडी, नारायणवाडी, नागापूर, लेकुरवाळी आखाडा, वरखेड, प्रवरासंगम, शिंगवेतुकाई, माका, देवगाव, देडगाव, माळीचिंचोरा, जेऊर हैबती, मुरमे, मडकी, बकुपिंपळगाव, खलालपिंप्री, शनीशिंगणापूर, पाचेगाव, तेलकुडगाव 36 इतर गावे.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.विधानसभा निवडणुकीत आ शंकरराव गडाख यांनी गावात पाणी योजना मार्गी लावू हा शब्द दिला होता त्याची शब्दपूर्ती भाऊबीजेपूर्वीच आमचा भाऊ म्हणून आ शंकरराव गडाख यांनी केली यामुळे आमची पाण्याची गैरसोय दूर होणार आहे.

- नंदा आंबाडे, कारेगाव, ता. नेवासा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com