नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती आर.एस. मोडसे यांच्याकडून नागरिकांच्या प्रतिज्ञापत्रावर

स्वाक्षरी करण्यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असून त्यांच्यावर कारवाई करणे बाबतचे निवेदन जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिटे यांनी नायब तहसीलदार संजय परदेशी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले की, नेवासा तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या श्रीमती आर. एस. मोडसे यांचेकडून नागरिकांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षर्या करण्यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळून सामान्य नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

त्यांच्याबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरी नागरिकांना त्रास देणार्या सदर कर्मचारी यांची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील नागरिकांच्यावतीने तहसील कार्यालयास कोणत्याही क्षणी टाळे ठोकण्यात येईल. निवेदनावर मानव साळवे, चांगदेव दारुंटे, गोरख गाडेकर, कमलेश भणगे, अमोल साळवे, रामभाऊ टाके, विजय शेरे आदींच्या सह्या आहेत.