
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या असून मोदी सरकार महागाई रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचे निषेधार्थ नेवासा तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बुधवार दि. 30 जून रोजी दुपारी 12 वाजता नेवासा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.तेल, डाळी, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. सर्व महागाईचे मूळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या प्रचंड किमती व मोदी सरकारची जनविरोधी धोरणे हे आहे.
2014 च्या असणार्या किंमतीच्या 60 ते 70 टक्के पेट्रोल आणी डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत उलटपक्षी क्रूड ऑईलच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात 50 ते 60 टक्के घट झाली तरी पण जनतेला महाग इंधन खरेदी करावे लागत आहे. स्वयंपाकाचा गैंस महाग झाला आहे. 450 रुपयांचे सिलेंडर 860 रुपयांना झाले आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधनावरील कर मोठ्या प्रमाणात कमी केले पाहिजेत तसेच डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस जीएसटीच्या कक्षेत आणले पाहिजे. परंतु सरकार याबद्दल खुपच उदासीन आहे. जनतेच्या लुटीत सरकार धन्यता मानत आहे.
निदर्शनात कॉ. बाबा अरगडे, कॉ. बन्सी सातपुते,कॉ.आप्पासाहेब वाबळे, कॉ. भारत अरगडे, कॉ. दत्ता गवारे, संजय फुलमाळी, भाऊसाहेब अरगडे, लक्ष्मण कडु, नामदेव गोरे, लक्ष्मण शिंदे, नंदू उमाप, सुनिल उमाप आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवासी नायब तहसीलदार श्री.परदेशी यांनी निवेदन स्विकारले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यावेळी उपस्थित होते.