
नेवासा | तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जेऊर हैबती येथे २४ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नेवासा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल असून एक आरोपी अटक आहे. दरम्यान, संतप्त माहेरच्या मंडळींनी रात्री अंत्यविधी प्रसंगी आरोपी पतीचे घर पेटवून दिले. मात्र नेवासा पोलिसांनी प्रसांगवधान राखत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत माहिती अशी, जेऊर हैबती येथील राणी राहुल इटकर (वय २४ वर्षे) हीचा जेऊर शिवारातील एका विहिरीत रविवार दि.१८ जून रोजी सकाळी मृतदेह आढळून आला. याप्रकरणी राजु गंगाराम मोहीते (रा. खंडाळा ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून राणीचा पती राहुल पोपट इटकर, भामाबाई पोपट इटकर (सासू), पोपट दशरथ इटकर (सासरा), पाडुरंग पोपट इटकर (दिर) सर्व रा. जेऊर हैबती, ता. नेवासे) यांचे विरोधात नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत राणीचे वडील यांनी फिर्यादीत राणीच्या सासरच्या मंडळीने तिचा माहेरून ट्रॅक्टर व मोटारसायकल विकत घेण्यासाठी पैसे आणावेत तसेच मुलबाळ होत नाही म्हणून छळ होत होता. त्या त्रासातून तिने आत्महत्या केली असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, राणीच्या मृतदेहाची नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रात्री साडेसात ते आठ वाजे दरम्यान माहेरच्या मंडळींनी जेऊर हैबती येथे अंत्यविधी दरम्यान राणीच्या पतीचे घराला आग लावली.
यावेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम खेडकर यांच्यासह कुकाणा पोलिसांनी प्रसंगावधान राखत ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. आगीत घरातील साहित्याचे किरकोळ नुकसान झाले असले तरी पोलिसनमुळे मोठी दुर्घटना घटना टाळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी संतप्त माहेरकडील मंडळीस शांत करून जमाव पांगावत शांततेत अंत्यविधी करून घेतला. पोलिसांनी पती राहुल इटकर यास ताब्यात घेतले आहे.