नेवाशातील खेळाडूला गमवावी लागली नोकरी

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना सचिवांनी वेळेत अहवाल दिला नाही
नेवाशातील खेळाडूला गमवावी लागली नोकरी

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

क्रीडा कोट्यातून पोलीस भरती झालेल्या व्हॉलीबॉल खेळाडूला क्रीडा खात्याकडून व्हेरिफिकेशन वेळेत प्राप्त न झाल्यामुळे सदर खेळाडूला नोकरीला मुकावे लागले. नेवासा येथील अभिजित सुरेश हुसळे या तरुणावर हा प्रसंग ओढावला असून त्यामुळे क्रीडा क्षेत्रामधून आश्चर्याबरोबर चिडही व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, सन 2016 मध्ये नागपूर येथे झालेल्या 18 वर्षांखालील मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद मिळविले होते. पुणे विभागाच्या संघातील अभिजीत हुसळे हा खेळाडू होता. याच विजेतेपदाच्या जोरावर त्याला क्रीडा कोट्यातून पोलीस दलामध्ये नोकरी मिळाली. पण 2016 च्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा अहवाल महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी वेळेत सादर केला नाही. हा अहवाल क्रीडा संचालनालय पुणे याठिकाणी वेळेत सादर करायचा होता. पण महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी हा अहवाल देण्यास दिरंगाई केली असा आरोप अभिजीतने केला आहे. हताश झालेल्या अभिजीतने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना निवेदने देखील दिली आहेत.

29 ऑक्टोबर रोजी अभिजीतला अपात्र केलेबाबतचे पत्र पोलीस खात्याने दिल्यानंतर सूर्यवंशी यांनी अभिजीतला अहवाल घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरला बोलावले. अपात्र ठरल्याने निराश झालेल्या हुसळेने मात्र तेथे जाण्यास नकार दिला. मुदत संपल्यानंतर श्री. सूर्यवंशी यांनी व्हेरिफिकेशनचा अहवाल क्रीडा उपसंचालकांना मेल केला. क्रीडा संचालक व व्हॉलीबॉल संघटना कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त राहिल्याने एका होतकरू, गरजू क्रीडापटूला नोकरी गमवावी लागल्याने क्रीडा क्षेत्रात राग व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अभिजीतने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, क्रीडा मंत्री सुनील केदार, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींकडे न्यायदानाची मागणी केली आहे.

ही लढाई एकट्या अभिजीतची नसून ती प्रत्येक खेळाडूची आहे. अभिजीत स्पर्धा खेळला व स्पर्धेत अजिंक्यपद देखील प्राप्त केले. याच कामगिरीच्या जोरावर त्याला स्पोर्टस् कोट्यातून पोलीस दलात नोकरी देखील मिळाली. एका अनुभवी सचिवाकडून स्पर्धेचा अहवाल देण्यास दिरंगाई का झाली? सदर खेळाडूचे झालेल्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? मायबाप सरकारला विनंती आहे की, या खेळाडूला लवकरात लवकर न्याय मिळावा.

- पापा शेख (अभिजितचे प्रशिक्षक)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com