नेवासा तालुक्यात जाणवतोय युरिया खताचा तुटवडा

नेवासा तालुक्यात जाणवतोय युरिया खताचा तुटवडा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यात सध्या युरिया खतांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खत शिल्लक नाही. ठराविक आरसीएफ किंवा झुआरी कंपनीच्या अधिकृत डिलरकडेच सध्या युरिया उपलब्ध आहे, पण त्यांच्याकडूनही शेतकर्‍यांना इतर खते घेतली तरच युरिया खत दिले जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

करोनामुळे लॉकडाऊनची झळ शेती उद्योगाला सर्वाधिक बसत आहे. शेतीसाठी लागणार्‍या युरिया आणि मिश्र खतांची टंचाई भासू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

एकीकडे रब्बी हंगामात पिकवलेल्या नाशवंत शेतमालाला उठाव नाही. भाजीपाला, फळे हा शेतमाल शेतकर्‍यांना कमी दरात घरोघरी जाऊन विकावा लागत आहे. यातून उत्पादन खर्चही फिटत नाही. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना हा माल शेतात फेकून द्यायची वेळ आली आहे. तर दुसरीकडे भंडारदरा, मुळा धरणाच्या शेती आवर्तनातून उभ्या असलेल्या पिकांच्या मशागती सुरू आहेत. पिकांना लागणार्‍या विविध स्वरूपाच्या विविध प्रकारच्या मिश्र खतांचा तुटवडा भासायला लागला आहे. किटकनाशके, तणनाशके आदी फवारणीच्या औषधांचाही तुटवडा भासू लागला आहे.

मागील महिन्यात तालुक्यात आरसीएफ व झुआरी कंपनीच्या माध्यमातून 450 टन युरिया आला होता. हा युरिया आरसीएफ व झुआरी या अधिकृत डिलरकडे आला. लवकरच तालुक्याला युरिया उपलब्ध होणार आहे.

-दत्तात्रय डमाळे तालुका कृषी अधिकारी, नेवासा

तालुक्यात इतक्या प्रमाणात युरिया साठा येतो, पण ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रात युरिया येत नाही.तालुक्यात जे ठराविक अधिकृत डिलर आहेत त्यांच्याकडेच तो येतो आणि ते बफर साठा करुन ठेवतात. त्यामुळे आम्ही ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्र चालवणार्‍यांनी काय भूमिका घ्यावी? एकीकडे शेतकर्‍यांची युरिया खतासाठी मोठी मागणी आहे.पण आमच्याकडेच उपलब्ध नाही तर आम्ही त्यांना काय देणार हाही प्रश्न आहे.

- अमित काळे कृषी सेवा केंद्र चालक, पाचेगाव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com