नेवासा-शेवगाव खड्डे बुजविण्याचे निकृष्ठ काम; ठेकेदारावर कारवाई करा

जीवनज्योत फाऊंडेशनची मागणी
File Photo
File Photo

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदारांनी शासनाची फसवणूक चालवली असून नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत निकृष्ट होत आहे.

खड्डे भरण्याच्या नावाने चाललेली लाखो रुपयांची लयलूट थांबवून निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदारांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी जीवन ज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले यांनी केली आहे.

पत्रकात श्री.नवले यांनी म्हंटले आहे की, नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरू आहे.त्या खड्ड्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात डांबर वापरले जात आहे. खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणारा कार्पेट लेयर देखील जास्त काळ टिकणार नाही.

पुढे बुजविले...मागे उखडले

नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र पुढे खड्डे बुजविण्याचे काम चालू आणि मागे खड्डे उखडण्यास सुरूवात झाली आहे. रस्त्यासाठी लाखों रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास पुढील वर्षी हीच समस्या उद्भवणार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेच्या पैशाची एकप्रकारे उधळपट्टी चालू आहे.

हे खड्डे बुजविण्याचे काम चांगले आणि दर्जेदार होण्यासाठी दखल न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंत्यास खुर्चीला बांधू असा इशारा ही देण्यात आला आहे.

नेवासा फाटा ते शेवगाव या रस्त्यावर खडी, डांबर चांगल्या गुणवत्तेचे न वापरलेमुळे या रस्तावरील पुन्हा खड्डे उघडे पडले आहेत. या कामात ठेकेदार, आधिकारी यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार होत आहे. नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावर खड्डे भरण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे.

खड्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदांरावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही कमलेश नवले यांनी केली.

ठेकेदार-अधिकारी हातमिळवणी

रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे कामात मोठया प्रमाणात गैरप्रकार करण्यात येत आहे. परंतु कोणताही अधिकारी रस्त्याचे कामाची पाहणी करण्यासाठी येत नाही. ठेकेदार व अधिकार्‍यांनी हातमिळवणी केली आहे.

- नरेंद्र नवथर प्रदेश उपाअध्यक्ष, छत्रपती युवा सेना

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com