
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा येथे नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नेवासा गावात सोमवारी मध्यरात्री एक ब्रास वाळूसह टेम्पो जप्त केला असून याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदीप संजय दरंदले यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, नेवासा गावात चिंचबन ते नेवासा रोडवर ज्ञानेश्वर मंदिरामागे सापळा लावून थांबलो असता रात्री दोन वाजण्याच्या सुमारास विटकरी रंगाचा टाटा 407 टेम्पो मंदिराकडे येताना दिसला. टेम्पो थांबवून चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण बहिरुनाथ पवार (वय 35) रा. गंगानगर ता. नेवासा असे असल्याचे सांगितले.
टेम्पो मालकाचे नाव अरुण गोंजारी रा. नेवासा बुद्रुक असल्याचे सांगितले. टेम्पो चालक व मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना बेकायदा शासकीय वाळू चोरुन वाहतूक करताना मिळून आला. 3 लाख रुपये किमतीचा विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो व दहा हजार रुपये किमतीची शासकीय मालकीची एक ब्रास वाळू असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. चालक लक्ष्मण बहिरुनाथ पवार रा. गंगानगर व टेम्पो मालक अरुण गोंजारी (फरार) रा. नेवासा बुद्रुक याचेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.