नेवासा (तालुका वार्ताहर) -

शहर व परिसरातील अवैध धंद्यासह वाढती गुन्हेगारी रोखण्यास नेवासा पोलीस सपशेल अपयशी ठरले असून अनेक प्रलंबित गुन्ह्याचा तपास अद्याप लावता आलेला न

सल्याने शहरात गुन्हेगारी वाढत आहे. भुरट्या चोर्या, अवैध दारू विक्री, मटका तसेच शहर व परिसरात घडणार्या गुन्हेगारीवर पोलिसांच्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे आवर घालणे अशक्य झाले आहे.

शहरात प्रत्येक चौकात अवैध दारू, मावा विक्री, मटका व जुगाराकडे शहरातील तरुणाई वळत असली तरी पोलिसांना हे व्यवसाय बंद करण्यात रस नसून पोलिसांना यातून मिळणारी गंगाजळी महत्वाची आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास लागत नसून मागील महिन्यात शहरात झालेल्या घरफोड्यांचा तपास अद्याप लागला नाही. तसेच रविवारी आठवडे बाजारात अनेक भुरट्या चोरांकडून मोबाईल, महिलांचे दागिने, पर्स लांबविण्याचे प्रकार सर्रास सुरू असले तरी पोलीस मात्र ठोस कारवाई करताना दिसत नाही. फक्त तक्रार अर्ज घेवून नागरिकांचे समाधान करत असतात.

पोलीस ठाण्यातील जुन्या-नव्या कर्मचार्यांच्या अंतर्गत वादाचा फटकाही कारवाईवर होताना दिसतो. बरेच कर्मचारी नवीन रुजू झाल्याने पोलीस ठाण्यात कायम तू-तू मै-मै सुरू असते. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचा यावर अंकुश नसल्याने असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे एका पोलीस कर्मचार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. काही कर्मचारी कारवाई करतात मात्र त्यांची ही कारवाई बनावट असल्याचेही पोलीस ठाण्यात बोलले जाते.

अनेक संघटनांनी तक्रारी करूनही अवैध व्यवसायावर अंकुश लावणे पोलिसांना जमेनासे झाले असून तात्पुरती कारवाई करत अवैध व्यावसायिक मालकांऐवजी नोकर वर्गावर कारवाई करून सोडून दिले जाते. अवैध व्यावसायिक व पोलिसांची जोडलेली नाळ कोण तोडणार? हा खरा प्रश्न आहे.

वाळूतस्कराला सोडून दिले?

दोन-तीन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातील एका अधिकार्याने वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून ‘तडजोडी’नंतर सोडून दिल्याची जोरदार चर्चा शहरात सध्या चालू आहे.