नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी-चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ

एकाच रात्री सुरेशनगर-हंडीनिमगाव शिवारात तीन ठिकाणी चोरी
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी-चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा तालुक्यात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत असून हंडीनिमगाव-सुरेशनगर शिवारात शुक्रवारी रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या.

तालुक्यातील सुरेशनगर येथे किराणा दुकानातून किराणा वस्तूंची चोरी झाली तर त्रिवेणीश्वर (हंडीनिमगाव) येथे महादेव मंदिराच्या दानपेटीतील रक्कम तसेच त्रिवेणीश्वर साहित्य भांडाराच्या दुकानातून वस्तूंची चोरी झाली.

किराणा दुकानातून 10 हजाराच्या वस्तूंची चोरी

सुरेशनगर येथील किराणा दुकानदार चंद्रभान विष्णू क्षीरसागर (वय 39) यांनी त्यांच्या दुकानातील चोरीबाबत फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते शनिवारी पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या सुरेशनगर येथील किराणा दुकानाच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून दुकानात प्रवेश करुन फिर्यादीच्या संमतीशिवाय दुकानातील वस्तू चोरुन नेल्या.

2 हजार रुपये किंमतीच्या हॉटमेस कंपनीच्या नेल पॉलिशच्या 20 बाटल्या, 1800 रुपये किंमतीच्या रास कंपनीच्या नेलकलरच्या 6 मिलीच्या 18 बाटल्या, 2600 रुपये किंमतीच्या निव्या कंपनीचे मेकअप किटचे 7 बॉक्स, 550 रुपये किंमतीचे स्प्रे सेंटचे 11 नग, दीडशे रुपये किंमीच्या फेस फाऊंडेशन निव्या कंपनीचा बॉक्स, 75 रुपये किंमतीचा स्वस्तिक कुमकुमचा एक बॉक्स, 100 रुपये किंमतीचे सिल्क सिंदूरचे 10 नग, 90 रुपये किंमतीचे कलर माईंड सिंकूर 9 नग, 220 रुपये किंमतीच्या एईआर पाऊच बाथरुम फिगवेन्सचे 4 नगर, 550 रुपये, 200 रुपये किंमतीच्या गायछाप कंपनीच्या तंबाखूच्या 20 पुड्या, 300 रुपये किंमीचे गोल्ड पॅक कंपनीचे सिगारेटची दोन पाकिटे, 630 रुपये किंमतीच्या विमल पान मसालाचे 35 नग, 28 रुपये किमचे राजनिवास पान मसालाचे 7 नग, 40 रुपये किमतीचे हिरा पानमसालाचे 8 नग तसेच 1800 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 10 हजार 583 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 683/2022 भारतीय दंड विधान कलम 380 व 457 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक अशोक कुदळे करत आहेत.

त्रिवेणीश्वर येथे दानपेटी फोडली; दुकानातही चोरी

हंडीनिमगाव (त्रिवेणीश्वर) येथे दानपेटी फोडून रक्कम चोरी तसेच साहित्य भांडाराच्या दुकानात चोरीची घटना घडली.

याबाबत गोरक्षनाथ नवनाथ गुंजाळ (वय 38) धंदा-मजुरी रा. हंडीनिमगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात 5 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 ते 6 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजेदरम्यान चोरी झाल्याचे म्हटले आहे.

त्रिवेणीश्वर येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडून त्यातून अंदाजे 450 रुपये चोरुन नेले. त्याचबरोबर त्रिवेणीश्वर साहित्य भांडार दुकानातील रोख रक्कम 800 रुपये त्याचबरोबर याच दुकानातून 700 रुपये किंमतीचे साहित्य असा एकूण 1950 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 684/2022 भारतीय दंड विधान कलम 380, 457, 511 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक अशोक कुदळे करत आहेत.

तीन दिवसापूर्वी याच भागात घरफोडी

हंडीनिमगाव शिवारात मंगळवारी रात्रीही घरफोडीची घटना घडली होती. आळंदी येथे देवदर्शनाला गेलेल्या कुटूंबाच्या घरातून साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 200 ग्रॅम चांदीचे दागिने व 15 हजाराची रोख रक्कम चोरीस गेली होती. शुक्रवारी रात्री याच परिसरात पुन्हा चोरीच्या तीन घटना घडल्या असून चोरट्यांना पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com