
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा पोलिसांनी सोमवारी पहाटे केलेल्या नाकाबंदीत सुमारे दोन लाखांच्या गुटख्यासह जवळपास 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नेवशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब दहिफळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक विजय भोंबे, हवालदार विठ्ठल गायकवाड, संतोष धोत्रे हे 17 जुलैला नेवाशात नाकाबंदी बंदोबस्त करीत होते. नेवासा फाट्याकडून पहाटे 3.30 च्या सुमारास आलेल्या मारूती स्विफ्टची (एमएच 12 जेयू 6679) त्यांनी तपासणी केली.
त्यामध्ये एम गोल्ड सुगंधित तंबाखूच्या चार खोक्यांत 1 लाख 92 हजारांची 320 पाकिटे आढळून आली. यातील गाडीचालक परवेज असिफ पठाण (वय 27) व साथीदार मोजीन अल्ताफ पठाण (वय 33) दोघे रा. नेवासा या दोघांना अटक केली. हा माल नेवाशातील अल्ताफ इमामखान पठाण यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी 1 लाख 92 हजार रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखूचे (गुटखा) चार बॉक्स, 4 लाखांची मारुती स्विप्ट गाडी, मोबाईल व रोख रक्कम असा, 5 लाख 94 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 765/2023 भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273, 328 सह अन्नसुरक्षा 59 आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.