नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा फाटा-शेवगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्यातील प्रत्येक खड्ड्यात पालक मंत्र्यांच्या प्रतिमेस आंघोळ घालून

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करणे व अंत्ययात्रा काढून अभिनव आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती जीवनज्योत फाउंंडेशनचे अध्यक्ष व छत्रपती युवा सेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम नेवासा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात श्री. नवले यांनी म्हटले की, नेवासा फाटा ते शेवगाव रस्ता अत्यंत दुरवस्थेत असून त्यावरती खड्डेच खड्डे पडलेले आहेत. सध्या तालुक्यातील साखर कारखान्याचे गळीत सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक वाढली आहे.

नेवासा फाटा ते भेंडा, कुकाणा, शेवगावकडे जाताना संपूर्ण रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत अनेकदा निवदने देऊनही महत्त्वाच्या या महामार्गाकडे संबंधित अधिकारी वर्गाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.

तालुक्यातील भेंडा व कुकाणा ही महत्त्वाची बाजरपेठेची ठिकाणे असल्याने भेंडा, कुकाणा, शेवगाव या महत्त्वाच्या गावातील नागरिक महत्त्वाच्या महामार्गावरून प्रवास करीत असतात. रात्रीच्यावेळी प्रवास करताना वाहन चालक व प्रवाशांना अंगावर शहारे उभे राहतात. अनेकवेळा रात्रीच्या वेळी खड्डा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहन चालकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागले आहे. मोटरसायकल प्रवाशांना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आलेले आहे.

दळणवळणाच्या द़ृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. भानसहिवरा, भेंडा, कुकाणा, शेवगाव ही बाजारपेठ असल्याने बाजाराच्या दिवशी व्यापारी उपजिवेकेसाठी रात्रंदिवस धावपळ करत असतात. या धावपळीमध्ये अनेक छोटे-मोठे अपघात खड्डा चुकविण्याच्या नादात समोरासमोर घडले जातात. तसेच नेवासा, शेवगाव येथील अनेक शासकिय निमशासकिय कर्मचारी नेहमीच प्रवास करत असतात.

त्यामध्ये रविवारी आठवडा बाजार भरतो त्या दिवशी देखील प्रवाशांसह व्यापारी वर्गाची मोठी आदळ आपट होते. रस्त्याच्या साईड पट्ट्याही अत्यंत खराब झालेल्या आहेत.त्यावर दोन ते तीन फूट खड्डे झालेले आहेत. त्यामुळे टूव्हीलर यांना अपघात होतात. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांना बळी पडतात. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागांना अनेकवेळा निदर्शनास आणून दिले असून देखील संबंधित अधिकारी दुरूस्तीच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

येत्या सात दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास पालकमंत्री यांच्या प्रतिमेस प्रत्येक खड्ड्यात आंघोळ घालून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून प्रतिनिधीक स्वरुपात अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर अक्षय बोधक, स्वप्निल बनसोडे शिलाताई गिरीकुमार, सचिन धस, विजय खरात, संदेश बोधक, आप्पासाहेब आरगडे आदींची नावे आहेत.