
नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अहमदनगर मार्गे औरंगाबादला रविवारी होणार्या जाहीर सभेसाठी रवाना होत असताना नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मनसे सैनिकांना व उपस्थित चाहत्यांना हात उंचावत दाद दिली. तालुकाध्यक्ष दिंगबर पवार यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे, रजनीताई पंडुरे, महिला तालुकाध्यक्ष मिराताई गुंजाळ, विलास देशमुख, सचिन गव्हाणे, भाजपाचे नेते प्रताप चिंधे, अदिनाथ पटारे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्यासह स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
राज ठाकरे यांचा ताफा नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला वेढा घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे यांच्या वाहनाकडे धाव घेतली. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून वाहनाच्या दरवाज्यातून बाहेर येत हात उंचावून जमावाला अभिवादन केले.
त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांसह ठाकरे यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चौधरी, उपनिरिक्षक समाधान भाटेवाल व कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
ताफ्यातील केदार शिंदे व अंकुश चौधरी यांच्या गाड्यांना घोडेगावजवळ अपघात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी पुण्यावरुन औरंगाबादकडे 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन जात होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही किरकोळ नुकसान झाले असल्याचे समजते.