नेवासाफाटा येथील तीन हॉटेलांवर पोलिसांचे छापे

शरीरविक्रय व्यवसाय करणार्‍या 7 मुलींना घेतले ताब्यात
नेवासाफाटा येथील तीन हॉटेलांवर पोलिसांचे छापे

नेवासा फाटा |वार्ताहर| Newasa

नेवासा फाटा परिसरातील एकाचवेळी तीन हॉटेलवर छापा टाकून शरीरविक्रय व्यवसाय करणार्‍या सहा परप्रांतीय तर एका महाराष्ट्रीयन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकाचवेळी तीन ठिकाणी कारवाई करण्याची पोलिसांची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.

नेवासा फाटा येथे अनेक ठिकाणी हॉटेल व लॉजिंग एकत्रित आहे. अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू होता. यासंदर्भात स्थानिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. परंतु आजपर्यंत कधीही कारवाई झाली नव्हती. अलीकडच्या काळात हा व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढला होता.

काल बुधवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. गेल्या आठ दिवसांपासून या कारवाईची तयारी सुरू होती. या कारवाईबाबत पोलिसांकडून अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. पोलीस अधिकारी संदीप मिटके व नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे या दोघांनाच या कारवाईची माहिती होती.

नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर, राहुरी येथील चार पोलीस निरीक्षक, सोनई येथील एक साहाय्यक पोलीस निरीक्षक व सुमारे 20 ते 25 पोलीस कर्मचार्‍यांचा या कारवाईत सहभाग होता. या कारवाईत सहा परप्रांतीय तर एका महाराष्ट्रीयन पीडित मुलीस ताब्यात घेण्यात आले. कारवाई झाल्यानंतर महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने या सर्व मुलींना नेवासा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती. नेवासा फाटा परिसरातील एकूण पाच हॉटेलवर पोलिसांनी एकाचवेळी छापे टाकले. परंतु त्यापैकी दोन हॉटेलवर पोलिसांना काही आक्षेपार्ह आढळले नाही.

कारवाई झालेल्या हॉटेल तिरंगा येथून तीन मुली, हॉटेल नामगंगा येथून तीन मुली तर हॉटेल पायलमधून एका मुलीला ताब्यात घेण्यात आले. या सर्व पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com