नेवासाफाटा येथे महामार्गावर दिवसभरात झाली दोनदा वाहतूक कोंडी

रुग्णवाहिकांनाही फटका; पोलिसांची बघ्याची भूमिका
नेवासाफाटा येथे महामार्गावर दिवसभरात झाली दोनदा वाहतूक कोंडी

नेवासा फाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे काल रविवारी सकाळी दोन तास तर सायंकाळी एक तास अशी दोनदा वाहतूक कोंडी झाली.

पहिली वाहतूक कोंडी सकाळी 11:30 वाजता झाली ती सुटण्यासाठी दुपारचे दीड वाजले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा 6 ते 7 या वेळेला वाहतूक कोंडीचे विदारक चित्र पहायला मिळाले. नगर-औरंगाबाद व शिर्डी-पैठण महामार्गाच्या मध्यावर असलेला नेवासा फाटा हा वाहतूककोंडीचे केंद्र अशी ओळख झालेली आहे.

पोलीस खात्याचे हे दुर्लक्षित ठिकाण जाणवत आहे. सध्या दिवाळी, भाऊबीज सणाचे दिवस तसेच परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या व शाळा सुरू होणार असल्यामुळे खरेदीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड यामुळे फाटा परिसराला गर्दीचे स्वरूप आले आहे, यावेळेत नेवासा फाटा येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हजर नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप वाहनधाकासह व्यावसायीकांना सहन करावा लागला.

त्याचाच फटका रुग्णवाहिकांना बसला.तब्बल 3 ते 4 तास वाहतूक कोंडीने गाड्यांचा कर्कश आवाज, धूर, हॉर्न यामुळे नागरिक हैराण झाले होते. नेवासा फाटा परिसरात वाहतूक कोंडी सध्या नित्याची बाब बनली आहे.

या वाहतूक कोंडीकङे पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे स्वतंत्र पोलीस चौकी होण्यासाठी पाठपुरावा करत असून चौकी झाल्यावर वाहतूक कोंडी व गुन्हेगारी, चोरी यास आळा बसेल असे नागरिक बोलून दाखवतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com