नेवासाफाटा येथे शेतकर्‍यांना व्यापार्‍यांची दमबाजी
सार्वमत

नेवासाफाटा येथे शेतकर्‍यांना व्यापार्‍यांची दमबाजी

Arvind Arkhade

नेवासाफाटा|वार्ताहर|Newasa Phata

करोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद असल्याने अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या भाजीपाला विक्रीबाबत नेवासा फाटा येथील भाजीपाला व्यापारी व दारोदार जाऊन भाजीपाला विक्री करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये सुप्त वाद सुरू झाले आहेत.

काही व्यापार्‍यांनी आपल्या परिसरात येऊन भाजीपाला विक्री करण्यार्‍या शेतकर्‍यांना मज्जाव केल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी आठवडे बाजार बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक भाजी विक्रते चढ्या भावाने भाजीपाला विक्री करत आहेत तर शेतकरी थेट दुचाकींवर दारोदार येऊन भाजीपाला स्वस्त दरात विक्री करत असल्याने स्थानिक दुकाने लावून बसलेले भाजीपाला विक्रते फेरीवाल्या शेतकर्‍यांना ही आमची गल्ली आहे.

येथे पुन्हा भाजी घेऊन आलात तर याद राखा अशी धमकी देत आहेत. त्यामुळे स्वस्त दरात मिळणार्‍या भाजीपाल्याला नेवासा फाटा येथील नागरीक मुकले असून स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी संबंधित शेतकर्‍यांनी केली आहे.

स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांनी शेतकरी फेरीवाल्यांना दम दिला किंवा फिरू दिले नाही तर त्यांच्या नावानिशी तक्रारी पोलीस ठाण्यात कराव्यात, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने कळविण्यात आलेले असून अशा भाजीपाल्या विक्रेत्यांनी नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे यांनी केले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com