नेवासाफाटा येथे अतिक्रमणांमुळे होतेय वाहतूक कोंडी

निष्पापांचे बळी जाण्यास जबाबदार कोण ? || नागरिकांचा सवाल
नेवासाफाटा येथे अतिक्रमणांमुळे होतेय वाहतूक कोंडी

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक व आंबेडकर चौकात वाहनांची मोठी वर्दळ असून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढल्यामुळे अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निष्पाप लोकांचे बळी जात असून येथील अतिक्रमणे त्वरित काढणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

नेवासाफाटा येथील अपघाताची मालिका अशीच सुरू राहिली तर याला जबाबदार कोण याचे स्पष्टीकरण आता सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावे लागणार आहे. त्यासाठी या खात्यालाच जबाबदार का धरण्यात येऊ नये? असा सवालही अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकातून शेवगाव व नगरकडे तर आंबेडकर चौकात नेवाशाकडून नगर व औरंगाबादकडे रस्ता वळण घेतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल, पान टपर्‍या, फळ विक्रेत्यांचा वेढा आहे. तर दुसरीकडे बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या गाड्या वाकड्या-तिकड्या रस्त्यावर लावून प्रवासी वाहतूक ही नेहमीच सुरू असते. त्यामुळे समोरून भरधाव वेगाने वाहने नगर व औरंगाबादच्या दिशेने येत असताना रस्त्यात निर्माण होणारे अडथळे तसेच रस्ता दुभाजक पार करत अतिक्रमणातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे.

या रस्त्यावर सर्वसामान्यांचा जीव वाचवायचा असेल तर बांधकाम विभागाने त्वरित अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत असल्यामुळे येथे अपघाताची मालिका सुरूच असून यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणधारकांसह प्रवासी वर्गाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे

नेवासा फाटा येथील दोन्ही चौकांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी आता नित्याचीच बाब झाली आहे. पोलीस प्रशासनालाही ही रोजचीच डोकेदुखी असून दिवसाबरोबरच रात्रीही या ठिकाणी कायमच अपघात होत असतात. त्यामुळे बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन या दोघांनी लक्ष घालून आता अतिक्रमण हटविणे ही आता काळाची गरज बनली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com