
पाचेगाव (वार्ताहर) -
नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडे असणार्या पाचेगाव, कारवाडी, पुनतगाव भागातील कांदा लागवडी क्षेत्रावर अतिपावसामुळे
सध्या बहुतांश जमिनीत कांदा पिकांमध्ये पांढरी सड या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
कांद्यामध्ये दिसून आलेला हा रोग जमिनीमधील हानिकारक बुरशीमुळे होतो. या रोगांची कांद्याच्या मुळांना सुरुवातीला लागण होते. त्यानंतर कांद्याच्या वाढणार्या कंदामध्ये बुरशी शिरते आणि संपूर्ण मुळे आणि कंद सडून जातो. कांदा लागवड केल्यानंतर दुसरे पाणी दिल्यानंतर कांद्याचे रोप मुळापासून सडून जात आहे. कांद्याची पात पिवळसर पडून जमिनीवर पडते आणि पूर्णतः वाळून जाते. ज्या जमिनीमध्ये जास्त दिवस ओलावा टिकून राहील, अशा जमिनीमध्ये ही हानीकारक बुरशी वाढते. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
एकतर महागडे कांदा बियाणे घेतले, कांदा बियाणे देखील दहा ते पंधरा हजार रुपये प्रति पायलीला विकत घ्यावे लागले. त्यानंतर कांदा रोपाची निगा ठेवत चांगल्याप्रकारे रोप आणले.त्यानंतर कांदा लागवडीसाठी शेतजमीन सज्ज करून एकरी दहा हजार रुपये देऊन शेतकर्यांच्या पदरी अशी निराशा पडली आहे.
जवळपास या रोगामुळे कांदा पिकामध्ये पंचवीस ते तीस टक्के मर दिसून येत आहे. काही शेतकर्यांच्या कांदा लागवडी पूर्ण झाल्या आहे तरी अजून बर्याच शेतकर्यांच्या कांदा लागवडी चालू होण्याचे बाकी आहे.त्यामुळे या रोगामुळे किती कांदा पीक हातात येईल अजून तरी सांगता येत नाही.
या रोगामुळे बर्याच शेतकर्यांनी चांगल्या पद्धतीने आणलेले कांदा रोप विकणे पसंत केले आहे. त्या कांदा रोपांचे पैसे करून घ्यायचे असेच या भागात चित्र दिसून येत आहे. या भागात सुरुवातीला कांदा रोपाला चांगली मागणी होती आणि पैसे देखील चांगले मिळायचे पण आता या रोगामुळे कांदा रोपांचे धरले तेवढे पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. त्यामुळे या भागातील महागडे रासायनिक व जैविक खते व बुरशीनाशकांची फवारणी करताना या भागातील शेतकर्यांची दमछाक होत आहे.
त्यात ढगाळ वातावरण अजूनही आहे ते सर्व पिकांची वाढ खुंटून पिके जमिनीवरच बाल्यावस्थेत दिसत आहेत. त्यामुळे रोज या भागातील शेतकरी अहोरात्र बुरशी व कीटकनाशके फवारणी करत आहेत.
कारवाडीमध्ये गोकुळ सुभाष तुवर या शेतकर्याच्या कांदा पिकावर बुरशीच्या जास्त प्रादुर्भावा मुळे एक एकर कांदा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली.