नेवाशासह नगर जिल्ह्यासाठी युरिया खताचा साठा वेळेवर उपलब्ध करा

नेवाशासह नगर जिल्ह्यासाठी युरिया खताचा साठा वेळेवर उपलब्ध करा

कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी ना. शंकरराव गडाख यांनी केली चर्चा

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

यावर्षी पाऊस भरपूर होण्याचा अंदाज असल्याने नेवासा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची पेरणी व लागवड होणार आहे. यामुळे खरीप पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर युरिया खतांची मागणी असणार असेल. ही संभाव्य मागणी लक्षात घेता जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांनी कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांची भेट घेऊन नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्याला खरीप पिकांसाठी आवश्यक असलेला युरिया खतांचा साठा वेळेवर उपलब्ध करून शेतकरी बांधवांना सहकार्य करणेबाबद एकत्रित बैठक घेत चर्चा केली.

यावेळी ना. गडाख यांनी ना. भुसे यांना नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील युरिया खताचा उपलब्ध साठा व आवश्यक मागणी याविषयी चर्चा केली. सध्या नगर जिल्ह्यासाठी 81 हजार 910 मेट्रिक टन युरिया खत मंजूर आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी मे महिन्याअखेर 26 हजार 820 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यत जिल्ह्याला 8949 मेट्रिक टन एवढाच खताचा पुरवठा झालेला आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे यावर्षी नियमित खताचा पुरवठा झालेला नाही त्यामुळे नगर जिल्ह्याला युरिया खताचा तुटवडा भासत आहे. नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्याची खताची असणारी उपलब्धता व तातडीची खरिपापूर्वीची मागणी या विषयांवर ना. गडाख व ना. दादाजी भुसे यांनी चर्चा केली.

ना. गडाख यांनी नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्याला खरिपापूर्वी आवश्यक युरिया खताचा तातडीने पुरवठा करावा व जिल्ह्याची गरज ओळखून युरियाच्या बफर साठ्याचे नियोजन करून मे 2021 पर्यंतचा राहिलेला 17 हजार 871 मेट्रिक टन खतांचा कोटा तातडीने पाठवण्याची मागणी केली. सदर मागणीनुसार कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागास तातडीने सूचना देऊन नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्याचा युरिया खताचा साठा खरीप पेरणीपूर्वी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबधित विभागास दिल्या व यावर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले.

ना. गडाख यांनी युरिया खताच्या खरिपासाठी उपलब्धतेबाबद मंत्री दादाजी भुसे यांचेकडे मागणी करून चर्चा केल्यामुळे नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्याला खरिप हंगामासाठी युरिया खत उपलब्ध होईल. यामुळे नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील शेतकरी बांधवांना खरिपाच्या पिकास लाभ होणार आहे.

दुकानांतील जुन्या दराचे खत त्याच दराने द्या

केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढविल्या आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच जुन्या दराचे खत काही दुकानात पडून आहे. ते शेतकर्‍यांना जुन्याच दराने मिळाले पाहिजे. करोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्‍यांवर अन्याय होता कामा नये. जादा दराने खतांची विक्री करणार्‍यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ना. गडाख यांनी कृषिमंत्र्याकडे केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com