नेवासा तालुक्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

सोनईतील एकाचा मृत्यू; अन्य 6 जणांवर उपचार सुरू
नेवासा तालुक्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

सोनई |वार्ताहर| Sonai

राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यातही करोना पाठोपाठ या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे.

श्रीरामपूर पाठोपाठ या आजाराने नेवासा तालुक्यात सर्वप्रथम सोनईत पहिला बळी गेल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोनई परिसरातील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सात दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे पुणे येथे निधन झाले असून दोघांची प्रकृती सुधारत आहे. एका रुग्णाचा धोका टळला आहे. एक रुग्ण उपचार घेऊन घरी आलेला असून एका रुग्णाचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. करोना संसर्गाची धास्ती वाढली असतानाच म्युकरमायकोसिसचे हळूहळू रुग्ण समोर येऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना एम्फोटोरीसीन बी या इंजेक्शनद्वारे उपचार दिले जात आहेत. मात्र रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. सामान्य रुग्णांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचारासाठी मंजुरी दिली असली तरीही काही खाजगी रुग्णालयात या योजनेतून उपचार मिळत नसल्याचे समजते. या गंभीर आजाराबाबत आरोग्य विभागाने तत्पर राहणे आवश्यक आहे. करोना संसर्गाची स्थिती ग्रामीण भागात वाढत असतानाच म्युकरमायकोसिसचे रुग्णही समोर येत आहेत. रुग्णालय व महागडे औषधे घेण्याची स्थिती नसलेल्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे असे ग्रामस्थांत बोलले जात आहे.

एका रुग्णाचे डोळे निकामी झाल्याची चर्चा

सोनईतील एकाचा पुण्यात म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला. दोघांची प्रकृती सुधारत आहे. एका रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. एक रुग्ण उपचार घेऊन घरी परतला आहे. तर एका रुग्णाचे दोन्ही डोळे निकामी झाले असल्याची चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com