कारवाईच्या ससेमिर्‍यामुळे नेवासा दूध संघ होणार बंद

दूध उत्पादक व कामगारांचा प्रश्न ऐरणीवर
कारवाईच्या ससेमिर्‍यामुळे नेवासा दूध संघ होणार बंद

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुका दूध संघावर राजकीय हेतूने सुरू असलेल्या एका मागोमाग कारवायांमुळे नेवासा तालुका दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

माजी मंत्री शंकरराव यांच्या ताब्यातील नेवासा तालुका दूध संघ बंद करण्यात आला असून संघाचे तसेच तालुक्यातील हजारो दूध उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संघाची वीज तोडू नये असा न्यायलयाचा आदेश असताना देखील वीज कनेक्शन कट करून माजी मंत्री गडाख यांना मोठा राजकीय शॉक दिला असल्याचे बोलले जात आहे.

नेवासा तालुक्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांना कुठे दूध घालायचे असा ज्यावेळेस प्रश्न होता त्यावेळेस आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या दूध संघाची निर्मिती झाली. मोठे राजकीय वजन वापरून वेळोवेळी पाठवपुरावा करून गडाख यांनी परवानगी मिळवली. संघामार्फत तालुक्यातील सुमारे 72 गावांत दूध थंड करण्यासाठी चिलिंग मशीन अनुदान देऊन वाटप करण्यात आले होते व शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळण्यास यामुळे मदत झाली होती.अर्थकारणाला गती मिळाली होती तसेच घोडेगाव येथे जनावरांच्या बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांना पशुपालनास प्रोत्साहन देणारे व मार्गदर्शन करणारे विविध शिबिरे राबवून संघाच्या मार्फत शेतकर्‍यांना मोठी मदत करण्यात आली होती.

नेवासा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक पत देण्याचे काम नेवासा दूध संघाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. महानंद, आरे तसेच गुजरातमधील अमूल या दूध संघाशी करार करून दूध उत्पादकांना वाढीव पैसे मिळवून दिले. तीरमली,डवरी गोसावी, वाघवाले या हातावर पोट असलेल्यांना व अल्पभूधारक शेतकरी यांना दूध संघामार्फत बिगर व्याजी 4 ते 5 कोटी रुपये देऊन गाई, म्हशी खरेदी करण्यास अ‍ॅडव्हान्स वाटप करण्यात आले होते.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दूध संघाचे पाठबळ मिळून आर्थिक पत निर्माण झाली. नेवासा तालुक्यातील आर्थिक प्रगतीत संघाचे मोठे योगदान आहे हक्काचा दूध संघ बंद होणार असल्याने दूध उत्पादक व कामगार यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 50 कर्मचारी बेरोजगार होणार असून त्यांच्या कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. 20 ते 25 हजार लिटर दूध कुठे घालायचे? हा प्रश्न दूध उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.

मुळा एज्युकेशनही बंद होणार ?

आमदार गडाख हे चक्रव्यूहात अडकले असल्याचे दिसून येत असून संघ बंद झाला असून मुळा शैक्षणिक संस्थेची तक्रार शासनाकडे चालू आहे.त्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनी लावलेले चक्रव्यूह गडाख यांना तोडता आले नाही. आगामी काळात गडाख हे मोठ्या अडचणीत सापडण्याची चर्चा होत आहे.

तालुक्याच्या अर्थकारणावर परिणाम

मुळा साखर कारखान्याच्या विविध तक्रारी, सूतगिरणी प्रकल्प लाल फितीत अडकवून ठेवला अशा विविध तक्रारी गडाख यांच्या संस्थेवर चालू आहेत. जर दूध संघासह दुसर्‍या संस्था अडचणीत आल्या तर त्याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनता, व्यापारी पेठेला बसणार आहे. यामुळे अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

राजकीय सूडबुद्धीने अनेक कारवाया झाल्यामुळे आमदार शंकरराव गडाख यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेलेला संघ बंद करताना मनाला मोठ्या वेदना होत आहेत. संघाला गावा गावांतून दूध संकलन करून देणारे व उत्पादकांच्या दुधाची व्यवस्था करून देण्यासाठी संघाचे कर्मचारी अहोरात्र झटले.त्यांना पुन्हा इतरत्र सेवेत घेऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शंकरराव गडाख संकट काळातही प्रयत्नशील आहेत.

- गणपत चव्हाण अध्यक्ष, नेवासा तालुका दूध संघ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com