श्री क्षेत्र नेवाशाची कामिका एकादशी यात्रा रद्द
सार्वमत

श्री क्षेत्र नेवाशाची कामिका एकादशी यात्रा रद्द

Arvind Arkhade

नेवासा|तालुका वार्ताहर|Newasa

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील आषाढ वद्य (कामिका) एकादशीला गुरुवार दि. 16 जुलै रोजी होणारी संत ज्ञानेश्वर माउलींची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख व देवस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले की सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड 19 या विषाणूजन्य रोगाचा फैलाव झाला असून त्याचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व नगर जिल्ह्यात देखील सुरू आहे. श्री क्षेत्र नेवासा हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान व माउलींची कर्मभूमी असल्याने नेवासानगरीत पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी शुद्ध एकादशीनंतर येणार्‍या आषाढी वद्य (कामिका) एकादशीला मोठी यात्रा भरत असते.

या दिवशी लाखोंच्या संख्येने माउलींच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी येथे पायी दिंड्यांनी येत असतात. मात्र या एकादशीच्या संबंधाने करोना रोगाच्या फैलावामुळे मानवीय जीवितास धोका असल्यामुळे या वद्य एकादशीला गुरुवारी दि.16 जुलै रोजी होणारा यात्रा शासकीय आदेशाचे पालन म्हणून रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने एकमताने घेतला आहे. यात्रोत्सव रद्द झाल्याने कोणीही श्रद्धेपोटी या स्थानावर दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. घरीच बसून माउलींचे ध्यान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com