नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय जोरात

पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबत उलटसुलट चर्चा
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय जोरात

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याला दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पडकल्याने

नेवासा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली मात्र पोलीस खात्याची प्रतिमा मालिन करणार्‍या या कर्मचार्‍याला कोणाचें पाठबळ होते? तसेच पूर्ववत सुरु झालेल्या अवैध व्यावसायिकांना कोणाचे पाठबळ मिळत आहे याबाबतची चर्चा नेवासा शहरात सुरु आहे.

नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात प्रथमचं अशी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापासून अनेक गुन्हे घडले आहेत. तालुक्यातील सलाबतपूर परिसरात एका व्यापार्‍याची मोटारसायकल राहत्या घरसमोरून चोरून नेल्याची घटना घडली.

तर दुसर्‍या दिवशी रात्री चक्क तीन ठिकाणी चोरांनी डल्ला मारला. गावातील मुख्य परिसरातील दुकानाचे शटर उचकटून कपडे चोरले तर बस स्थानक परिसरातील किराणा दुकानातून समान व पाच ते सहा हजार रुपयांची चिल्लर चोरली. शिरसगाव रस्त्यावर घरासमोरून बुलेट गाडी चोरीस गेली. सलग दोन दिवस चोर्‍या झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.

यानंतर नेवासा शहरातील पंचायत समिती आवारातून व सेंट्रल बॅक समोरुन मोटारसायकल चोरी गेल्याची घटना घडली. आठवडे बाजारातून मोबाईल चोरी जाण्याच्या घटना चालूच आहे.

तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु आहेत. वाळूतस्करी, गुटखा, बिंगो, मटका, गोमांस तस्करी, जुगार अड्डे अशा विविध अवैध धंद्यावर पोलीस ठाण्याचा धाक राहिलेला नाही. हे धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

छोट्या मोठ्या गावात मुंबई, कल्याण, चेन्नई, अशा मटका टपर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे. गोमांस वाहतूक देखील जोरात सुरू आहे. सलाबतपूर, नेवासा अशा ठिकाणाहून रात्री उशिरा गोतस्करी केली जाते या सर्व बाबींकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

अवैध व्यावसायिकांना भक्कम पाठबळ

नेवासा शहरासह नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या विरोधात महिलांनी दारू बंदी मोर्चा काढला होता. यानंतर नेवासा ते नेवासा फाटा रोड वरील अवैध दारू विक्री दुकान बंद करण्यात आले मात्र नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांच्या कार्यकाळात हे दुकान पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याला पाठबळ कोणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध व्यावसायिक व पोलीस यांची जोडलेली नाळ कोण तोडणार? हा खरा प्रश्न आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com