नेवासा तालुक्यात जोरदार वादळी पावसाने पिकांचे नुकसान; अनेक रस्ते बंद
सार्वमत

नेवासा तालुक्यात जोरदार वादळी पावसाने पिकांचे नुकसान; अनेक रस्ते बंद

ऊस-मका पिके भुईसपाट; ओढे-नाले दुथडी; वडाळ्यात सर्वाधिक 135 मिलीमीटर पावसाची नोंद

Arvind Arkhade

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

गुरुवारी रात्री नेवासा तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार वादळी पाऊस कोसळला. सर्वाधिक पाऊस वडाळा बहिरोबा येथे 135 मिलिमीटर पडला तर तालुक्यात सरासरी 76.75 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वादळी पावसाने ऊस-मका पिके भुईसपाट झाली आहेत.

नेवासा तालुक्यात गुरुवारी रात्री 9 वाजे पासून पावसाला सुरुवात झाली. तासभर झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील नदी, ओढे-नाले पुन्हा वाहते झाले आहेत.तालुक्यातील नेवासा खुर्द (120मिमी), वडाळा बहिरोबा (135 मिमी) व सलाबतपूर (126 मिमी) या तीन मंडलात ढगफुटी सदृश पाऊस झाला.

रात्री 10:30 वाजता सुमारे अर्धा तास जोरदार वादळ झाल्याने अनेक गावातील झाडे पडली. उंच वाढीची उभार असलेली ऊस व मका या सारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

नेवासा तालुक्यात 127 महसुली गावे असून या गावासाठी 8 महसूल मंडले आहेत. मंडल निहाय झालेला गुरुवारचा पाऊस (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी.

सोनई - 56 (698), नेवासा खुर्द-120 (530), वडाळा बहिरोबा- 135 (640), कुकाणा-35 (407), घोडेगाव 48 (489), सलाबतपूर -126 (596), चांदा -76 (550), नेवासा बुद्रुक -18 (438)

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा मंडळात सर्वांधिक 135 मिमी पावसाची नोंद झाली.तर कुकाणा मंडलात 35 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस नेवासा बुद्रुक मंडलात 18 मिलीमीटरची नोंद झाली आहे. भेंडा बुद्रुक येथे 48 मिमी पावसाची नोंद झाली. 2 महिन्याचे विश्रांती नंतर भेंडा परिसरातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे.

नेवासा शहर परिसरात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढ्याला मोट्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नेवासा शहरात येणारे रस्ते बंद झाले. नेवासा-खडका फाटा रस्त्यावर असलेल्या काजी नाला ओढ्याला पुर आल्यामुळे दुपारपर्यंत रस्ता बंद झालेला होता. तसेच रानमळ्याकडे व उस्थळदुमालाकडे जाणारा रस्ता पूर आल्यामुळे बंद झाला होता. रात्रभर विजेचा लपंडाव चालू होता. त्यामुळे नेवासा शहरातील मध्यमेश्वर बंधारा तुडूंब भरून वाहु लागला आहे.या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस सलाबतपूर येथे 596 तर सर्वात कमी पाऊस कुकाणा 407 मिलीमीटर इतका नोंदला गेला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com