नेवाशातील 9 जणांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार

गोवंश जनावरांची कत्तल करुन मांसाची विक्री
नेवाशातील 9 जणांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणार्‍या गुन्हेगारांच्या टोळीस जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या टोळीवर पाच वर्षात नेवासा पोलीस ठाण्यात 8 तर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे.

गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणार्‍या टोळीचा प्रमुख नदिम सत्तार चौधरी, रा. नाईकवाडी, मोहल्ला, नेवासा व टोळी सदस्य फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलिम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबु शहबुद्दीन चौधरी, मोजि उर्फ मोइज अबु चौधरी, जबी लतिफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी, अकिल जाफर चौधरी (सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला नेवासा) यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन हद्दित व अहमदनगर जिल्हा परिसरात टोळीचे वर्चस्व कायम राहावे याकरीता गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी तस्करी करणे, अमानुषपणे वागणुक देवून त्यांना विना चारा पाण्यापाचुन डांबुन ठेवणे, त्यांची कत्तल करणे, धार्मिक भावना दुखावणे, जिवीतास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असणारे गुन्हे करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे सन 2018 ते 2023 या कालावधीत सराईतपणे केलेले आहेत.

टोळीच्या गैरकृत्यास प्रतिबंध होण्यासाठी कायदेशीर कारवाई करुन व प्रतिबंधक कारवाई करुनही टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द पोलीस निरीक्षक नेवासा यांनी जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी करुन शिफारस अहवाल सादर केला होता.

सदर प्रस्तावाची पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी चौकशी करुन वरील 9 जणांना दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com