जलस्वयंसेवकांचा सन्मान न ठेवल्यास जलसाक्षरतेचे काम बंद पडेल- डॉ. सिंह
सार्वमत

जलस्वयंसेवकांचा सन्मान न ठेवल्यास जलसाक्षरतेचे काम बंद पडेल- डॉ. सिंह

Arvind Arkhade

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

स्वतंत्र जलसाक्षरता केंद्र सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. जलयोद्धे, जलनायक, जलप्रेमी, जलदूत यांच्या माध्यमातून जलसाक्षरता चळवळीची एक फळी राज्यात उभी राहिलेली आहे. स्वतःचा वेळ खर्च करून कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता हे जल स्वयंसेवक कमी संसाधनामध्ये काम करत आहेत.

सरकारने या सर्व जल स्वयंसेवकांना विश्वासात घेतले पाहिजे, सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच त्यांचाही सन्मान राखला पाहिजे. तसे झाले नाही तर हे जल स्वयंसेवक नाउमेद होऊन राज्यभर निर्माण झालेली ही फळी विखुरली जाईल.असे झाले तर जल साक्षरतेचे काम बंद पडेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी दिला.

जलसाक्षरता केंद्र यशदा, पुणे यांचे वतीने पाण्याचे प्रदूषण-कारणे,मानके आणि उपाय या विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते.

यशदाच्या उप महासंचालीका नयना गुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, उपसंचालक डॉ.सोनटक्के, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे, डॉ. विनोद बोधनकर, डॉ. अजित गोखले, उदय गायकवाड, डॉ. स्नेहल डेंडे, संदीप चोडणकर आदी जल-पर्यावरण क्षेत्रातील तज्ञगण उपस्थित होते.

डॉ.राजेंद्र सिंह म्हणाले, भारतीय आस्था आणि पर्यावरणाचा मूलसिद्धांत आपण विसरलो असल्याने नद्यांचे प्रदूषण वाढले, नद्या कोरड्या पडल्या आणि आपण बे-पाणी झालो. जिथे पाणी आहे तेही पिण्या लायक राहिले नाही ही सर्वात मोठी समस्या आहे.

महाराष्ट्रातील पीक पद्धत (क्रॉप पॅटर्न) ही पावसाच्या पध्दतीवर (रेन पॅटर्न) आधारित नसल्याने पाणी संपत आले तरी आपली पाण्याची मागणी संपतच नाही.नदीचे पुनर्जीवन करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांबरोबरच स्वच्छ पाणी आणि सांडपाणी एकत्र न करता ते वेगवेगळे ठेण्याची गरज आहे.पाण्याचा सन्मान करा,पाण्याचा वापर कमी करा,वापरलेले पाणी पुन्हा उपयोगात आणा,पाण्याचा पुनर्वापर करा असेही डॉ.सिंह म्हणाले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनीही मार्गदर्शन केले. मंडळाचे सहसंचालक डॉ.वाय.बी.सोनटक्के यांनी पाण्याचे प्रदूषण-कारणे,मानके आणि उपाय या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

देशातील एकूण मोठ्या धरणांपैकी 42 टक्के धरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत. तरीही पाणी नसल्याने सर्वाधिक आत्महत्या याच राज्यात झाल्या आहेत. आपल्या आधुनिक शिक्षण पद्धतीने, इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजीने नैसर्गिक संसाधनांचे जास्तीत जास्त शोषण करणे शिकविले आहे. मात्र पोषण करण्याचे विसरलो. जलस्रोतांचे शोषण वाढले असल्याने महाराष्ट्रात पाण्याची कमतरता निर्माण झाली, असेही डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com