नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिर परिसरात आषाढी एकादशी असतानाही प्रथमच शुकशुकाट

पहाटे पूजा-अभिषेकानंतर मंदीर झाले बंद
नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिर परिसरात आषाढी एकादशी असतानाही प्रथमच शुकशुकाट
नेवाशा ज्ञानेश्वर मंदिर

नेवासा (तालुका वार्ताहर)- देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये माऊलींच्या पैस खांबासह विठ्ठल-रुख्मिनीच्या मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने यावर्षी आषाढी वारीचा उत्सव रद्द केल्याने एरवी गर्दीने फुलून जाणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर प्रांगणात भक्तांच्या विना परिसरात शुकशुकाट दिसून येत होता.

करोना महामारीच्या संकटामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद आहे. फक्त नित्यनेमाने पूजापाठ केला जातो. आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास माऊली भक्त अंबादास भागवत व सौ.प्रयोगाबाई भागवत तसेच नंदकिशोर महाराज खरात व सौ. वर्षा खरात या दाम्पत्याच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात मंदिरातील मुख्य माऊलींच्या पैस खांबासह विठ्ठल रुख्मिनीच्या मूर्तीस दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात येऊन आरती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य नेवासा येथील आचार्य ऋषिकेश जोशी यांनी केले.

यावेळी वारीची परंपरा जोपासत सलाबतपूर येथून पायी आलेले मच्छिंद्र महाराज निकम तसेच मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, मच्छिंद्र भवार डॉ. करण घुले, गोरख भराट, मयूर डौले, शिवाजी होन उपस्थित होते. प्रशासनाच्या सामाजिक अंतराचे पालन करत सकाळचा अभिषेक विधी करण्यात आला.

मंदिर बंद असले तरी संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर हे रस्त्यावरच असल्याने येथे दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी लांबूनच हात जोडून दर्शन घेतले. दिवसभर काही मंडळी भेट देऊन गेले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, माधव दरंदले, शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे आदींचा समावेश होता.

करोनाचे संकट लवकर जाऊ दे... मानवजात सुखी होऊ दे... असे साकडे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी विठुरायाला घातले. ते म्हणाले की यावर्षी वारी नाही याचे मोठे दुःख आहे. मात्र विठुराया हा मंदिरात उपासनेसाठी तर भक्तांच्या उद्धारासाठी तो चराचरात असतो. कोरोनाच्या या विळख्यातून तो विश्वातील मानव जातीला नक्कीच मुक्ती मिळवून देईल हे संकट ही लवकरच दूर होईल व पुन्हा भक्तीचा मळा फुलेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com